जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील शहीद लान्स नायक कुलदीपसिंग यांच्या पार्थीवावर रविवारी जींद जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हरियाणा पोलिस आणि राज्य सरकारची नाचक्की झाली. शहीदाला राजकीय सन्मान देण्यासाठी हरियाणा पोलिस गंज लागलेल्या बंदूका घेऊन गेले. सलामी देताना पोलिसांनी हवेत गोळाबार करण्यासाठी रायफल खांद्यावर घेऊन ट्रिगर दाबले मात्र त्यातून गोळीच बाहेर निघाली नाही. यावेळी तिथे उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकारी तोंड लपवत राहिले, तर भाजप सरकार असलेल्या हरियाणा राज्याचा एकही मंत्री शहीदाला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित नव्हते.
पोलिसांच्या या बेजबाबदारपणामुळे शहीदाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांसमोर त्यांची लक्तरे निघाली. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दुसरीकडे भाजप सरकारचा एकही मंत्री शहीदाला श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित नव्हता. याची देखील उपस्थितांमध्ये चर्चा होती. रविवारी सकाळीच लष्कराचे जवान पार्थिव घेऊन गावात आले. साधारण 10 वाजता अंत्ययात्रेला सुरवात झाली. यावेळी गावकर्यांच्या डोळ्यात गावच्या सुपूत्रासाठी आश्रू होते आणि त्याच्या वीरगतीचा गर्व देखील होता.
शहीद कुलदीपसिंग यांचे मोठे बंधू वजीरसिंग यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पोलिस जवानांनी रायफलमध्ये गोळ्या टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा गंज लागलेल्या त्या बंदूकीमध्ये गोळ्या जात नव्हत्या. कसे तरी हाताने ठोकून-ठाकून त्यांनी बंदूकीत गोळ्या टाकल्या. हवेत दोन-दोन राऊंड फायर करण्यासाठी बंदूका खांद्यावर घेतल्या आणि फायर केले तेव्हा गोळ्या बाहेर निघाल्याच नाही. मोठ्या कष्टाने एकादोन बंदूकीतून फायरिंग झाले. शहीदाला अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत जमलेल्या गावकर्यांना प्रश्न पडला की, शहीदाच्या सन्मानात पोलिसांच्या बंदूकीतून गोळी निघाली नाही, तर गुंड आणि बदमाशांचा निकाल हे कसे लावणार. दुसरीकडे त्याचवेळी लष्कराच्या जवानांनी आपल्या शहीद साथीदाराच्या सन्मानात हवेत फायरिंग करुन श्रद्धांजली वाहिली.