पुणे-“कुणी आपल्यावर लिंबू फेकून मारत असेल तर एक बरणी घ्या आणि त्या लिंबाचे सरबत बनवा. माझे जीवनाचे हेच तत्त्वज्ञान राहिले आहे.” हे शब्द आहेत रचना गुप्ता (वय ४१) यांचे. गेल्या आठवड्यात हयात पुणे हॉटेलमध्ये झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन’ सौंदर्य स्पर्धेत रचना यांनी ‘मिसेस स्टाईल आयकॉन २०१९’ हा बहुमान जिंकला आहे.
रचना यांचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षी झाला आणि दुर्देवाने वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. या आव्हानातून त्या धैर्याने बाहेर येत त्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करुन विजेत्या ठरल्या. आज त्या ख्यातनाम इंटिरियर डिझायनर व होम डिझाईन कन्सल्टंट असून स्वतःच्या होम ह्यु व क्रिएटिव्ह इंडिया या दोन कंपन्यांचे उत्तम व्यवस्थापन करतात. खेरीज एक फर्निशिंग स्टोअरही चालवतात. त्या पुणे व इतर शहरांतील विविध पंचतारांकित हॉटेलांना सॉफ्ट फर्निशिंग्ज पुरवणाऱ्या पुरवठादार म्हणूनही काम करतात.
सौंदर्य स्पर्धेत बहुमानाचा मुकूट प्राप्त केल्यावर त्या म्हणाल्या, “मी एक मुलगा (वय १९) व एक मुलगी (वय १४) अशा दोन किशोरवयीन मुलांची आनंदी आई असून मला माझ्या भूमिकेचा अभिमान आहे. एकाचवेळी काम सांभाळणे, दोन तरुण मुलांचे संगोपन करणे आणि घराची आघाडी या गोष्टी एकटीने सांभाळणे ही खरंतर खडतर लढाई होती. पण त्यामुळे माझी वाटचाल मंदावली नाही किंवा जीवन व साहसाप्रतीचा माझा उत्साहही निस्तेज झाला नाही. मला प्रवासाची आकांक्षा असून या छंदावर माझे मनापासून प्रेम आहे. प्रवासाच्या आवडीनेच मी देशाचे विविध भाग फिरुन पाहिले व अनेक परदेशांनाही भेट दिली. मला शर्यतीत वाहन चालवण्याची (रॅली ड्रायव्हिंग) आणि पदभ्रमणाची (ट्रेकिंग) आवड असून मी मित्र व कुटूंबासमवेत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी वेळ काढते.”
या सौंदर्य स्पर्धेबाबत त्या म्हणाल्या, “ स्पर्धेत भाग घेणे हा जीवनातील सर्वाधिक आव्हानात्मक क्षण होता. माझी आई व मुलगी यांनी मला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. मी मंचावर पाऊल टाकले तेव्हा मला त्या स्पर्धेची भव्यता जाणवली. अंतिम फेरीपूर्वी चार दिवस दिवा पेजंट्सचे मालक असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आम्हा सर्व ४२ स्पर्धकांच्या आयुष्यात पूर्णपणे बदल घडला. अंजना व कार्ल यांचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि दिग्दर्शनामुळे मी घडले आणि मला माझ्यातील सामर्थ्य व समोरच्या संधी बाहेरुन पाहता आल्या. या दोघांनी मला अधिक कणखर व अधिक आत्मविश्वासू बनवले. मला यापुढे आंतरराष्ट्रीय मंचावर स्पर्धेत सहभागी होण्याची आकांक्षा आहे.”
स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात अश्मित पटेल (चित्रपट अभिनेता), मुग्धा गोडसे (अभिनेत्री व मॉडेल), अदिती गोवित्रीकर (अभिनेत्री, मॉडेल व मिसेस वर्ल्ड २००१ बहुमान विजेती), कार्ल मस्कारेन्हास, पिया पावानी, गौरांगी श्रावत, सिमरन गोधवानी, कमल शर्मा (हयातच्या पदाधिकारी) व डॉ. रचना शर्मा यांचा समावेश होता.