पुणे-रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलतर्फे आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर द हँडिकॅप्ड (इडीएआरसीएच) या पुणेस्थित स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांना नुकतेच व्होकेशनल एक्सलन्स रोटरी ॲवॉर्ड हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
बीएमसीसी येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांचा पद्मश्री लीला पूनावाला यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्या आमदार मेधा कुलकर्णी, सन्माननीय पाहुणे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूरव रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या प्रेसिडेंट शलाका भालेराव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
डॉ. देशपांडे हे नामवंत व्यावसायिक असून हा पुरस्कार त्यांनी इडीएआरसीएच संघटनेच्या माध्यमातून विशेष-क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये कौशल्य विकास घडवण्यात व त्यांना रोजगारक्षम बनवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
हा पुरस्कार विनम्रतेने स्वीकारल्यानंतर केलेल्या भावनिक भाषणात डॉ. देशपांडे यांनी पत्नी चित्रा व कुटूंबाने दिलेल्या अखंड पाठिंब्याबाबत आभार मानले व पुरस्कार इडीएआरसीएच संघटना परिवाराला अर्पण केला. ते म्हणाले, “विशेष-क्षमता असलेल्या व्यक्तींना दैवी सामर्थ्याचे वरदान असते, ज्यातून त्यांना कल्पक कौशल्ये लाभतात, ज्यांचा विकास पुढे सामान्य लोकांहून उत्तम कामगिरी करण्यासाठी होतो. हे लोक एकत्र काम करणारा संघ आहे, ज्यात दृष्टीवंचित, मानसिक वंचित, कर्णबधीर व अपंग व्यक्तींचा समावेश आहे. एकत्रितरीत्या हे लोक किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, कादंबरी ऑटोपार्ट्स अशा कंपन्यांसाठी १७ ते १८ प्लॅस्टिक भाग बनवतात. त्यातून त्यांना रोजगारक्षम बनल्याचा अभिमान लाभतोच, परंतु ते स्वतः व कुटूंबासाठी रोजगारही कमावतात.”
लीला पूनावाला यांनी डॉ. देशपांडे यांच्या स्तुत्य उपक्रमाचा व ते करत असलेल्या महान कार्य़ाचा गौरव केला. हे काम ते केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर अंतःकरणापासून करतात. डॉ. देशपांडे यांनी आपले कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, अशी सूचनाही लीला पूनावाला यांनी केली.
दीपक शिकारपूर म्हणाले, की कौशल्य विकास हा सर्व वयाच्या लोकांना रोजगारक्षमतेसाठी महत्त्वाचा ठरतो. या व्यक्तीनी नोकरदार होण्यापेक्षा नोकरदाता व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विशेष-क्षमता असलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत डॉ. देशपांडे यांच्या समर्पिततेचा आमदार मेधा कुलकर्णी यांनीही गौरव केला. अशा व्यक्तींसाठी एक कॉर्पोरेट पार्क बनवण्याचे डॉ. देशपांडे यांचे स्वप्न असल्याचे ऐकताच त्यांनी सरकारकडून हवी ती मदत देऊ केली आहे.
डॉ. देशपांडे यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून डी. लिट. पदवी प्राप्त झाली आहे.