पुणे, : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’ने पोलिस, सशस्त्र दले, वीर नारी व वीर पुरुष यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी गेल्या महिन्यात ‘एज्यु-सोशिओ कनेक्ट इनिशिएटिव्ह (२०१७)’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा पुढाकार पुढील टप्प्यात नेण्याचा एक भाग म्हणून ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या (एसएनएस) इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी नुकतीच पुण्यातील पोलिसांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजीनगरमधील पोलिस ग्राऊंडवर जाऊन विद्यार्थ्यांनी महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बघितले आणि त्यांचा सत्कार केला. प्रशिक्षण सत्रादरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांची शिस्त आणि समन्वय पाहून हे विद्यार्थी भारावून गेले.
वैभवी राऊत या विद्यार्थिनीने मराठीत प्रास्ताविक करुन सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. हा कार्यक्रम कशासंदर्भात आहे, याची माहिती उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पुरुष पोलिसांना राखी बांधली तर विद्यार्थ्यांनी महिला पोलिसांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. सर्व विद्यार्थ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मध्ये सुरु असणाऱ्या अल्पकालीन कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देऊ करणारी पत्रे यावेळी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी आपली शैक्षणिक व कौशल्यात्मक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या हेतूने त्यांच्या पसंतीचा यापैकी कोणताही अभ्यासक्रम निवडावा, असे प्रोत्साहनही देण्यात आले.
कार्यक्रमाच्या समाप्तीस ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनी पोलिसांची आपल्या समाजातील भूमिका विद्यार्थ्यांना विशद केली. पोलिसांनी नागरिकांच्या कल्याणासाठी घालून दिलेल्या नियमांचे आपण पालन करणे महत्त्वाचे आहे, या मुद्यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल, तसेच सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल पोलिस प्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांचे पियूष बॅनर्जी याने आभार मानले. डॉ. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांसाठी हा आगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.