पुणे- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या चौथ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात मिकीयास येमता, रेश्मा केवटे यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला गटात आदिनाथ भोसले, आकांक्षा शेलार यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि स्पर्धा 21किलोमीटर, 10किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकूण 2000धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून प्रारंभ झाला आणि संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे पुन्हा फिरून संजीवन मैदान असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता.
हाफ मॅरेथॉन(21कि.मी.)खुल्या पुरुष गटात केनियाच्या मिकीयास येमताने 01:07:59सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, केनियाच्या स्टीफन कोसगीने दुसरा आणि दिलीप जामदारने तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला खुला गटात रेश्मा केवटे हिने 01:40:11सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10कि.मी. खुल्या पुरुष गटात आदिनाथ भोसले याने 00:37:43सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, महिला गटात आकांक्षा शेलारने 00:46:52सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले.
स्पर्धेत एकूण 3लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ हिशम सुनेसरा(21किलोमीटर आयएफएफबी प्रो विजेता) व आय लव पाचगणी संघटनेचे भरत पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):
हाफ मॅरेथॉन 21कि.मी.: पुरुष खुला गट: 1. मिकीयास येमता(01:07:59से), 2.स्टीफन कोसगी(01:18:34से), 3.दिलीप जामदार(01:26:36से);
हाफ मॅरेथॉन 21कि.मी.: महिला खुला गट: 1. रेश्मा केवटे(01:40:11से), 2.स्नेहल हिरवे(01:51:36से), 3.शलाजा पाटणकर(02:19:48से);
10कि.मी. पुरुष खुला गट: 1.आदिनाथ भोसले(00:37:43से), 2.आदित्य भोसले(00:38:09से), 3.दिनेश म्हात्रे(00:38:14से);
10कि.मी.महिला खुला गट: 1.आकांक्षा शेलार(00:46:52से), 2.सायली कोकितकर(00:48:05से), 3.विशाखा साळुंखे(00:52:25से).