- नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रांसच्या बेनॉय पैरे यांची आगेकूच
पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत भारताच्या युकी भांब्रीला फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टकडून 6-4, 3-6, 4-6 असा पराभवाचा सामना पत्करावा लागल्यामुळे त्याचे स्पर्धेतील एकेरी गटांतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर, नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रांसच्या बेनॉय पैरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 81व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट याने जागतिक क्रमवारीत 118व्या स्थानावर असलेल्या भारताच्या युकी भांब्रीचा 4-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या व 1तास 50मिनिटे चाललेल्या या सामन्यात युकीने पहिल्याच गेममध्ये पिएरेची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये युकीने 40-40असे गुण झाले असताना युकीने दोन अफलातून फटके परतावून लावत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिएरेने अधिक भक्कम सुरुवात केली. या सेटमध्ये पिएरेने युकीची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये, तर युकीने पिएरेची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण सामन्यात 5-3 अशा फरकाने आघाडीवर असताना 9व्या गेममध्ये पिएरेने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट युकीविरुद्ध 6-3 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये पिएरेने वेगवान व चतुराईने खेळ केला. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट युकीविरुद्ध 6-4 अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. यावेळी पिएरे म्हणाला की, पहिल्या सेटमध्ये मला हवी तशी सर्व्हिस करता आली नाही कारण मला सूर गवसला नव्हता. हुकमी सर्व्हिस हे माझे प्रमुख अस्त्र आहे. परंतु तेच निष्प्रभ ठरल्यामुळे पहिला सेट युकीला जिंकता आला. परंतु सर्व्हिस हेच माझं गुण मिळविण्याचे मुख्य साधन असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आणि दुसऱ्या सेटमध्ये यश मिळाले. त्यामुळे दुसरा सेट जिंकून सामन्यात मला 1-1 अशी बरोबरी साधता आली. तरीही सामना जिंकण्याकरिता आणखी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे मला जाणवत होते. त्यामुळे तिसऱ्या सेटमध्ये मी माझी सर्व्हिस राखण्यावर भर दिला. कारण माझी खेळण्याची तिच शैली आहे. त्यातच युकीची सर्व्हिस अत्यंत मोक्याच्या क्षणी भेदण्यात मला यश मिळाले त्यामुळे मला हा सामना जिंकता आला. युकीने या संपूर्ण सामन्यात चांगली झुंज दिली. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करावा लागला.
जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हासी याने जागतिक क्रमवारीत 113व्या स्थानावर असलेल्या चिलीच्या निकोलस जेरीचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(5), 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2तास 10मिनिटे चालला. जागतिक क्र.41 असलेल्या फ्रांसच्या बेनॉय पैरेयाने जागतिक क्र.85 असलेल्याहंगेरीच्या मार्टन फॉक्
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: एकेरी:
पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रांस)(8)वि.वि.युकी भांब्री(भारत)4-6, 6-3, 6-4;
बेनॉय पैरे(फ्रांस)(4)वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स(हंगेरी)6-4, 6-7(4), 7-6(6);
रॉबिन हासी(नेदरलँड)(5)वि.वि.निकोलस जेरी(चिली)3-6, 7-6(5), 7-5;