पुणे- कलेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या ‘कलानिधी’ संस्थेतर्फे ‘दिवाळी पहाट’ अंतर्गत सकाळी उदयोन्मुख गायिका श्रुती विश्वकर्मा यांची सुश्राव्य मैफल चांगलीच रंगली. पं. केदार बोडस यांची शिष्या असलेल्या श्रुती विश्वकर्मा हिने आपल्या गानमैफिलीची सुरुवात भटियार रागाने केली आणि बिलासखानी तोडीने मैफिलीची सांगता केली. कोथरूड येथील काजल सोसायटीमध्ये झालेल्या या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी श्रुती विश्वकर्माला प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) आणि नीरजा गोडसे व श्रुती गुरव (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
उत्तरार्धात पं. शेखर बोरकर यांचे शिष्य अभिषेक बोरकर यांचे बहारदार सरोदवादन झाले. त्यांना प्रणव गुरव (तबला) आणि गिरीश चरवड (तानपुरा) यांची साथसंगत लाभली. प्रारंभी ‘कलानिधी’ संस्थेच्या संचालिका अपर्णा गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर या गानमैफिलीस उपस्थित होते.