पुणे: पुणेस्थित कलावंत संदीप सिन्हा यांनी नुकतीच एक अद्भुत कलाकृती साकारली आहे. त्यांनी १४ इंच गुणिले ११ इंच आकाराच्या एकाच कॅनव्हासवर जीवन व जागतिक तापमानवाढ विषयाधारित १ सेंटिमीटर गुणिले १ सेंटिमीटर आकाराची तब्बल ९४५ मिनिएचर पेंटिंग्ज रंगवली आहेत. या असाधारण व वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीमुळे संदीप सिन्हा यांना भरघोस प्रसिद्धी आणि प्रशंसा प्राप्त झाली असून त्यांच्या नावाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड रेकॉर्ड सेटर’ (https://recordsetter.com/worl
ही कलाकृती साकारण्यामागील कल्पना स्पष्ट करताना संदीप सिन्हा म्हणाले, “ मला काहीतरी अद्वितीय निर्मिती करुन दाखवायची होती. अशी कलाकृती साकारायची होती, जी माझ्या देशाला जागतिक गौरव मिळवून देईल. याच कारणाने मी ही चित्रशैली निवडली.” माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक असलेले संदीप सिन्हा मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे असून सध्या पुण्यातील टेक महिंद्र कंपनीत काम करतात. चित्र रंगवण्यात त्यांना अपार आनंद मिळतो, त्याहीपुढे ते चित्रकलेचा वापर तणाव व्यवस्थापनाचे माध्यम म्हणून करतात. ते आपल्या बहुतेक कलाकृती कल्पनेतून साकारतात आणि त्यासाठी ॲक्रिलिक रंगांचा वापर करतात. संदीप एक वर्षभर अमेरिकेत असताना त्यांना एक महिना काम नव्हते. त्याचवेळी त्यांनी मिनिएचर पेंटिंग्ज या वैशिष्ट्यपूर्ण कलेचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या चित्रांमधील रंग, रचना व वैविध्य लक्षात घेता त्यांच्या कलेत एक अनोखेपणाची भावना आहे. दृश्य तत्त्व हा समान धागा त्यांच्या प्रत्येक चित्रात आढळून येतो. या चित्रांवर त्यांनी दिवसाला आठ तास काम करुन संपूर्ण कलाकृती केवळ २२ दिवसांत साकारली आहे. आपल्या हातून घडलेल्या या मेहनतीचे फलित बघून ते स्वतःच आश्चर्यचकित झाले.
ते म्हणतात, “ जग बघण्याचा सर्वोत्तम मार्ग हा डोळे मिटल्यानंतर दिसतो. मला बाह्य जगातील काहीही प्रेरणा देत नाही. मी माझ्याच अंतरंगात प्रवेश करतो तेव्हाच त्या प्रेरणेचा आविष्कार होतो. मी एखादी कलाकृती रेखाटतो तेव्हा ती माझ्या भावनांच्या आधारे असते. मला जे जाणवते तेच माझ्या कलेत अवतरते. चित्र रंगवणे हे एकप्रकारे ध्यानधारणेसारखेच आहे. हे रंगच मला सुखद अनुभूती आणि शांतता मिळवून देतात. अगदी छोटी कलाकृतीही माझ्या भावना, माझा आत्मा आणि माझी स्वप्ने यातील दुवा असते.”
विविध नवी माध्यमे, विविध कागद, शैली व तंत्रे यांच्यासोबत प्रयोग करुन बघण्यावर संदीप यांचा विश्वास आहे. ते म्हणतात, “रंग एका लयीत वाहतात, तसा मीही त्यांच्यासोबत वाहात जातो. हे रंग आणि ती निर्मिती यांच्या माध्यमातून मी वैश्विक उर्जेशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो. ही वैश्विक ऊर्जा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून मनाचीच सुप्तावस्था असते. माझ्या सर्व चित्रांतून निसर्ग, देखावे व देवाच्या स्वर्गीय रचना प्रतिबिंबीत होतात.”