पुणे – रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांच्याशी संवादाच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन येथील साधू वासवानी मिशनमध्ये आज झाले. ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ दादा वासवानी – ए परफेक्ट डिसायपल, ए रिलक्टन्ट मास्टर’ या नावाचे हे पुस्तक रुझबेह भरुचा यांनी लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्याचे रेव्ह. दादा जे. पी. वासवानी आणि श्री. भरुचा यांनी संयुक्तपणे आज येथे जाहीर केले. दोघांनीही माध्यमांशी एकत्रित संवाद साधल्याने ही पत्रकार परिषद म्हणजे आगळा क्षण ठरला.
हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या पेंग्विन इंडिया संस्थेने नमूद केले आहे, की पुस्तकात दादा वासवानी यांनी अंतर्यामीचे विचार व आदर्श रुझबेह भरुचा यांच्यासमोर प्रकट केले आहेत. दादांच्या विनोद बुद्धीचा प्रत्यय या चर्चांमध्ये आला असून दोघांमधील संभाषणे हास्य, आनंदाने परिपूर्ण, तरीही प्राचीन सत्ये व जीवनातील ज्ञानाचा आविष्कार घडवणारी आहेत.
रुझबेह भरुचा हे अत्यंत प्रभावी अशा आध्यात्मिक लेखकांपैकी आहेत. ‘फकीर ट्रायॉलॉजी’ या प्रसिद्ध पुस्तक मालिकेचे लेखक म्हणून नावलौकिक असलेल्या श्री. भरुचा यांची आजवर १४ पुस्तके प्रकाशित झाली असून ते एक लघुपट निर्मातेही आहेत. ‘यमुना जेन्टली वीप्स’, ‘आय बिलिव्ह आय कॅन फ्लाय’ व ‘सेहत विंग्ज ऑफ फ्रीडम’ हे त्यांनी बनवलेले लघुपट पुण्यात झालेल्या एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाले होते.
या पुस्तकासंदर्भात बोलताना रुझबेह म्हणाले, की मी गेले काही महिने दादांच्या मुलाखती घेत होतो. त्यांच्याशी संवाद हा माझ्यासाठी महान क्षण होता. आम्ही हास्यविनोदात खूप रमलो. दादा हे मला भेटलेल्या बुद्धिमान आणि विनोदप्रिय व्यक्तींपैकी आहेत. मी पारशी आहे आणि आजवर उत्तम विनोदबुद्धीची देणगी लाभलेल्या अनेकांना भेटलो आहे, परंतु त्यातही दादा सर्वाधिक श्रेष्ठ जाणवले.
दादा आणि श्री. रुझबेह यांच्या संभाषणाचे विषय विविधांगी होते. प्रार्थनेच्या शक्तीपासून ते या जगात परिस्थितीच्या कैदेत न राहाता जीवन कसे जगावे येथपर्यंत, खऱ्या शरणागतापासून ते गुरु व शिष्याच्या भूमिकेपर्यंत, कर्म आणि मुक्त इच्छेच्या संकल्पनेपासून ते मृत्यूनंतरचे जीवन व सकारात्मक स्वीकारापर्यंत अनेक पैलू त्यात समाविष्ट होते.
दादा जे. पी. वासवानी हे सर्वाधिक लोकप्रिय आध्यात्मिक व्यक्तीमत्त्वांपैकी असून ते भारताचे प्रख्यात जीवन मार्गदर्शक अधिकारी (लाईफ गाईड मास्टर) आहेत. त्यांची शिकवण अनुसरण्यास अत्यंत सोपी आहे. ते वैज्ञानिक, द्रष्टे आणि व्यासंगी विद्वान आहेत. दादांची भाषणाची शैली विचारसमृद्ध असली तरी त्याला रुक्ष गांभीर्यापेक्षा सुखद अशा विनोदाची किनार असते. हलक्या-फुलक्या विनोदामुळे जीवनाचे तत्त्वज्ञान अत्यंत रंजकतेने श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचते. दादांनी १५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. जगातील १७ भाषांत त्यांचा अनुवाद झाला असून त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
‘कॉन्व्हर्सेशन्स विथ दादा वासवानी’ हे पुस्तक म्हणजे एक आध्यात्मिक प्रवास आहेच, परंतु महत्त्वाचे म्हणजे तो सिद्ध आणि साधकातील संवादही आहे. या पुस्तकाची पृष्ठसंख्या २८८ असून किंमत २९९ रुपये आहे. ते ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व विविध रीटेल बुक स्टोअर्समध्ये उपलब्ध असून प्रत्येक पुस्तकप्रेमीच्या संग्रहात आवर्जून स्थान मिळवेल, असे आहे. ते ई-बुक स्वरुपातही उपलब्ध आहे.