परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमजान ईद ‘ चा गोडवा !
‘आझम कॅम्पस ‘ चा पुढाकार ,१२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाईचे वाटप
पुणे :दूरदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी आज (मंगळवारी ) सकाळी एकत्रितपणे रमझान ईद चा गोडवा अनुभवला ! डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन १२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली . यात विद्यार्थीनींचाही समावेश होता .
आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात . तिकडे हे चंद्रदर्शन आज झाल्याने पुण्यातही परदेशी विद्यार्थ्यांनी आजच ईद साजरी केली .
आझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली . रमजान चे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद -उल -फित्र )! त्यानिमित्त आज सकाळी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील मशिदीत या पुणेस्थित परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमा जपठण केले . एकमेकांची प्रेमभरी गळाभेट घेतली रमझान ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि एकमेकांची वास्तपुस्त केली . पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली !
आझम कॅम्पस परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देण्यात आली . महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,आझम कॅम्पस चे विश्वस्त ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते .
‘रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले . घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते . एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते . पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते ,हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे ‘,असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले .