रोटरी क्लबतर्फे २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पुण्यात’जलोत्सव २०१९’ चे आयोजन
पुणे :रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे ‘जलोत्सव २०१९’ चे आयोजन दिनांक २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे .
पाण्याविषयी ,पाणी वापर ,बचत ,पुनर्वापर याविषयी जागरूकता,जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर यावर्षी भर देण्यात येत आहे .
रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वॉटर कमिटी चे अध्यक्ष सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
२७ फेब्रुवारी रोजी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत ‘जलक्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . नितीन करमळकर ,भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे ,वनस्पतीशात्रज्ञ डॉ . सचिन पुणेकर त्यात सहभागी होतील .रोटरी क्लब कोथरूड ,रोटरी क्लब अमनोरा यांनी संयोजन केले आहे .
या जलोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे . यात डॉ अरविंद नातू ,उमेश मुंडले ,व्ही एम देसाई ,ओ . मणीवान्ना ,प्रदीप पुरंदरे ,उपेंद्र धोंडे ,कृष्णा लव्हेकर ,डॉ . सुनील गोरंटीवार ,डॉ श्रीकांत गबाले ,रवींद्र उलंघिवार ,संजय इनामदार ,प्रभात रंजन यांची व्याख्याने होणार आहेत . रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ही या जलोत्सवात २ मार्च रोजी होणार आहे
दरम्यान ,रोटरी जलोत्सवच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च – (आयसर ,पाषाण ) येथे २३ फेब्रुवारी रोजी आयसर (पाषाण )संस्थेत प्रदीप लोखंडे ,डॉ . अरविंद नातू ,अशोक रुपनर यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ याठिकाणी आयोजित करण्यात आला होता . रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड ,पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांनी संयोजन केले .