‘नाट्यपदांची पुणेकरांना मेजवानी
पुणे ः’भारतीय विद्या भवन’ आणि ’इन्फोसिस फाऊंडेशन’च्या वतीने
‘ मराठी रंगभूमी दिनाच्यानिमित्ताने ‘नमन नटवरा’ या संगीत रंगभूमीच्या वैभवशाली पर्वाच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘संवाद पुणे’ आणि ‘पायल वृंद पुणे’ संस्थांच्या वतीने प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे, सुनील महाजन आणि निकिता मोघे यांनी पत्रकाद्वारे दिली.
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित 59 वा कार्यक्रम आहे. या वेळच्या कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन, निकिता मोघे आणि प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मा.दीनानाथ मंगेशकर, छोटा गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, पं.राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, जयमाला शिलेदार यांच्या गायन परंपरा जतन करणार्या या कलाकारांचा सन्मान आणि गप्पा असा कार्यक्रम होणार आहे.
यामध्ये निर्मला गोगटे, फैयाज, डॉ. वंदना घांगुर्डे, रजनी जोशी, डॉ. मुकुंद राम मराठे आणि डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचा समावेश आहे.
संगीत रंगभूमीची सुरेल परंपरा जपणारे सुप्रसिध्द गायक – गायिका, अभिनेता – अभिनेत्री यांचे गाजलेल्या नाट्यपदांचे गायन, त्यांचे रंगभूमीवरील किस्से यांची सुरेल मेजवानी देखील पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
हे कलाकार रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला पणत्या उजळून दिवाळीचे स्वागत करणार आहेत.
मराठी रंगभूमीचा अमृत सोहळा ‘नमन नटवरा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने १२५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या व मराठी रंगभूमीची परंपरा जपणाऱ्या भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष आनंद पानसे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला ‘मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखा’चे सहकार्य लाभले आहे.
5 नोव्हेंबर इ. सन.1843 या दिवशी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या संगीत सीता स्वयंवर या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रंगभूमीच्या इतिहासात 5 नोव्हेंबर ’मराठी रंगभूमी’ दिवस म्हणून नोंदविण्यात आला. 5 नोव्हें 2018 या दिवशी रंगभूमी 175 व्या वर्षात पदार्पण करित आहे. याचे औचित्य साधून मराठी रंगभूमी दिनाच्या अमृत सोहळ्याच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम होणार आहे.