लोकसभा निवडणूकीत जागांमध्ये घट,पण सर्वात मोठा पक्ष भाजपच ‘ : सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित
पुणे :’ ज्योतिष ज्ञान ‘ दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा शाहू मोडक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
‘ नववर्षाचे ग्रहमान, लोकसभा निवडणूक ‘ या विषयावर ‘ ज्योतिष ज्ञान ‘ दिवाळी अंकाचे संपादक आणि ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिध्देश्वर मारटकर यांचे व्याख्यान झाले.
हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे रविवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ झाला.
ग्रहस्थिती पाहता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या जागांमध्ये घट होईल, सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी मिळेल,असे भाकित सिध्देश्वर मारटकर यांनी या कार्यक्रमात वर्तवले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढतील, पण काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही. महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक झाल्यास भाजपा -सेना युतीला सत्ता स्थापन करता येईल. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यास सत्ताधारी भाजप -सेना युतीला सत्ता स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल, डिसेंबर मध्ये होणारी ६ राज्यातील विधानसभा निवडणुक भाजपाला जड जाईल, सत्ता बदलाचे योग आहेत.
असे ते म्हणाले.
२०१९मध्ये पाऊस उशीरा सुरू होईल, आणि सरासरीपेक्षा कमी पडेल, शेअर मार्केट तेजीत राहील, शेजारी राष्ट्रांच्या कटकटी सुरू राहतील,असेही भाकित त्यांनी सांगीतले.
सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘ सर्वसामान्यांना ज्योतिष आणि भविष्याबद्दल कुतूहल असतेच, पण, ज्योतिषाच्या टीकाकारांनाही स्वतःच्या भविष्यात जाणून घेण्याची उत्सुकता असते. ‘मी वेगळ्या क्षेत्रात यशस्वी होणार ‘ असे भविष्य माझ्या शाळकरी वयात दासगणू महाराजांनी वर्तवले होते, असेही गाडगीळ म्हणाले.
‘ आयुष्यात चांगल्या गोष्टींवर श्रध्दा ठेवली की मार्ग दिसतो. ज्योतिषाच्या माध्यमातून ही बऱ्याच गोष्टी समजतात ‘ असे मनोगत प्रतिभा मोडक यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत दीडभाई यांनी सूत्रसंचालन केले.