पुणे- महापालिकेच्या मिळकत कर विभागातील नागरी सुविधा केंद्रात पकडलेल्या बोगस कर्मचाऱ्याला महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे . या अधिकाऱ्याने हेतुपुरस्पर घेतलेल्या चलाख धोरणामुळे तथाकथित बोगस कर्मचारी निर्धास्त झालेला आहे.
गेल्या १९ जुलै ला मायमराठी च्या सहाय्याने कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनी या बोगस कर्मचाऱ्याला रंगे हाथ पकडले होते.विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटीलदेखील या मोहिमेत संपर्क साधून होते . २० जुलैला शिंदे तसेच विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी प्रशासनापुढे याबाबत विचारणा केल्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आणि महापालिका स्तरावर चौकशी करून 3 आठवड्यात अहवाल सादर करू असे आश्वासन मुख्य सभेला दिले होते.वास्तविक पाहता या प्रकारची संपूर्ण माहिती विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटलांना असताना यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी , तुपे यांना मुख्य सभेत बोलताना विरोध करण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेस आता 1 महिना उलटून गेला आहे ,मात्र प्रशासनाकडून अद्यापही याबाबतचा अहवाल देण्यात आलेला नाही . दरम्यानच्या काळात मायमराठी ने घेतलेल्या मागोव्यानुसार .. २० जुलैला महापालिकेतील जोगळेकर,बोरसे नामक कर्मचारी यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेवरून तातडीने संगणकांची तपासणी केली .आणि काही कागदपत्रे तपासली . याच दिवशी प्रशासन अधिकारी गिरीश पत्की यांना पोलिसात तक्रार नोंदविण्याचे आदेश देण्यात आले . वास्तविक पहाता हा प्रकार घडला १९ जुलैला; तेव्हा मी कामावर उपस्थित नव्हतो असे असतानाही मला तक्रार नोंदविण्यास का सांगता ? असा प्रश्न यावेळी पत्की यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला होता . मात्र त्याचा उपयोग झाला नाही . त्यामुळे पत्की यांनी वरिष्ठांनी सांगितल्यानुसारच फिर्याद दाखल केली . या प्रकारानंतर आणखी सूत्रे वेगाने हलली . राजपाठक आणि गराडे नावाच्या 2 महिला कर्मचारी ज्या सीएफसी मध्य काम करीत होत्या . त्यांची बदली आरोग्य खात्यात ९ महिन्यांपूर्वीच झाली होती ,या शिवाय अनिल जाधव नामक कर्मचाऱ्याची बदली देखील अग्निशामक दलात झालेली होती .मात्र बदलीच्या जागेवर रुजू होत नाही म्हणून या कर्मचाऱ्याचे वेतन महापालिकेने थांबविले होते. तरीही हे अधिकारी ,कर्मचारी मिळकत कर विभागातच तळ ठोकून काम करीत होते .बोगस कर्मचाऱ्याला पकडताच या सर्वांनी बदलीच्या जागेवर पळ काढला .आणि नंतर पत्की यांची बदली नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. प्रशासन अधिकारी वैभव कडलग , दयानंद सोनकांबळी यांची देखील बदली करण्यात आली . यातील कडलग यांनी तातडीने आदेशान्वये बदलीच्या जागेवर जाणे पसंत केले. मात्र सोनकांबळी हे अजूनही इथेच तळ ठोकून आहेत . ज्या कर्मचाऱ्याच्या जागेवर बसून बोगस कर्मचारी सूत्रे हलवीत होता तो गणेश लाड ही ‘मी नाही त्यातली ‘ च्या स्वरूपात मिळकत खात्यात मिरवीत आहे. या मागे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेला आशीर्वाद असल्याचे बोलले जाते . कारण याच कारणास्तव बोगस कर्मचाऱ्याला अटक झाली नसल्याचे वृत्त आहे . तब्बल १५ दिवसानंतर म्हणजे 5 ऑगस्ट रोजी त्याने शिवाजी नगर न्यायालयातून १५ हजार रुपये रोखीचा अटकपूर्व जामीन घेतला. आणि १९ ऑगस्टला पोलिसात हजेरी लावून आपला जबाब नोंदविला . आपण पूर्वी इथे ठेकेदारा मार्फत कामाला होतो. सध्या काम नाही म्हणून इथे पुन्हा काम मिळेल काय ? या चौकशी साठी महापालिकेत गेलो होतो असे या बोगस कर्मचाऱ्याने जबाबात म्हटले आहे .या जबाबा मागे ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याची चलाखी असल्याचे समजते आहे.
या शिवाय आणखी गौड बंगाल ठरले ते खुद्द आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समिती बाबतच …प्रथम आयुक्तांनी सहआयुक्त विलास कानडे यांच्या अधिपत्याखाली शीतल कळसकर आणि तुषार दौंडकर यांची समिती नेमली होती .पण अचानक एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सूत्रे फिरविली आणि समितीतील कानडे आणि दौंडकर यांना वगळण्याचा प्रयत्न झाला . पण प्रत्यक्षात कळसकर आणि दौंडकर वगळले गेले . त्यांच्या जागेवर सतीश कुलकर्णी आणि राहुल जगताप यांची नेमणूक झाली .इथून पुढे समितीच्या कारभाराला चाप कसा बसेल याचे प्रयत्न सुरु झाले. कानडे यांना जुमानायचेच नाही असा प्रयत्न सुरु झाला . अखेर सहआयुक्त कानडे यांनीच सतीश कुलकर्णी यांच्याकडे जावून काल समितीची पहिली बैठक घेतली .
खालील प्रश्नांना महिनाभर बगल देण्यात आली .. ते प्रश्न पाहू यात ..
1)येथून बदली झालेले काही अधिकारी , कर्मचारी विनावेतन इथे काम करीत होते काय ?त्यांची नावे काय ? आणि वेतनाबाबतचे तसेच बद्लीबाबतचे कागदपत्रे कुठे आहेत ?खाते प्रमुखांनी याबाबत दुर्लक्ष का केले ?
2)ज्या गणेश लाड च्या खुर्चीवर बसून बोगस कर्मचारी काम करीत होता .त्याचा लेखी जबाब ,त्याला काढलेली नोटीस कुठे आहे ?
3)सीएफसी मधील सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना दिले काय ? समितीपुढे आतापर्यंत मागवून का घेतले नाही ?गेल्या 3 वर्षाचे फुटेज तपासले काय ?असे सीसी टीव्ही फुटेज महिनाभरात कोणी कोणी तपासले?
4)महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारातील ये जा करणाऱ्या व्यक्ती दिसतात असे सीसी टीव्ही फुटेज तपासणार कोण ? तिथे संबधित बोगस कर्मचारी कधीपासून पालिकेत किती वाजता येतो आणि किती वाजता जातो याचे रेकोर्ड महिनाभरात कोणी कोणी तपासले?
5)मिळकत कर प्रमुख यांच्या कार्यालयातील सीसी टीव्ही फुटेज तपासण्यात आले काय ? येथे बोगस कर्मचाऱ्याचा वावर होता काय ?
6)पोलिसात तक्रार नोंद्विल्यानंतर महापालिकेच्या विधी खात्याने आणि विधी समितीने यावर कोणती कार्यवाही महिनाभरात केली ?
महापालिकेच्या मुख्य इमारतीत हा गुन्हा घडल्याने विधी खात्याला किंवा विधी समितीला याबाबत पोलिसांकडे पाठपुरावा करून आरोपीला कठोर शासन व्हावे असे का वाटले नाही ?
7)बोगस कर्मचारी पकडल्यावर तत्क्षणी त्यास पोलिसांच्या ताब्यात का दिले नाही ?