पुणे – स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलच्या बोगस कारभाराचा काल मुख्यसभेत कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सादरीकरणसह पर्दाफाश करून या दोन्ही कंपन्या महापालिकेच्या पर्यायाने जनतेच्या पैशांवर चालत असूनही त्या आपल्या कामकाजाबाबत पालिकेचे अथवा जनतेचे दायित्व न स्वीकारता परस्पर बोगस कारभार करत असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले यासाठी त्यांनी केलेल्या कामकाजाचे कार्यवृत्त महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांसमोर ठेवले पाहिजे असा दिलेला प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला. त्यांचा हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी उपसूचना भाजपच्या मनीषा नागपुरे यांनी दिली ती भाजपच्या संख्याबळावर संमत झाली.
महापालिकेच्या मुख्य सभेच्या मान्यतेनंतर स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएल ने निव्वळ महापालिकेकडून पैसे घ्यायचे आणि मनमानी कारभार करायचा याबाबत बागवे यांनी संगणकावर मुख्य सभेत छायाचित्रांसह सादरीकरण केले. आणि बोगस कारभाराची माहिती दिली .या दोन्ही कंपन्यांच्या धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयाचा कार्यवृत्तांत मुख्य सभेला सादर केला पाहिजे असा प्रस्ताव दिला .
या कंपन्या बरखास्त कराव्या अशी मागणी आपण केली नाही . मात्र भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभार झाला तरच तो जनहिताचा होईल आणि जनतेचा दिलेला पैसा योग्य मार्गे खर्ची होईल त्यासाठी या दोन्ही कंपन्यांवर किमान जनतेने निवडून दिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी यांनी नियंत्रण ठेवायला हवे मात्र यावर केवळ चारच लोकप्रतिनिधी नियंत्रण ठेवत असल्याने सर्व कारभार बोगस पद्धतीने होत असल्याचा आरोप बागवे यांनी यावेळी केला .पीएमपीएमएल मध्ये केवळ भाड्याने बसेस घेण्यावर कोट्यावधींची उधळण,सायकल चालवू या हा संदेश आणि सायकल मार्गाच्या नावाखाली शेकडो कोटीची उधळण ,तसेच पदपथावरून मंदिरे ,गरिबांच्या झोपड्या ,रोजगाराचे व्यवसाय उखडून टाकायचे आणि पदपथ मात्र पादचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याएवजी एल and टी कंपनीला जाहिरातींचे फलक लावायला उपलब्ध करून देणे अशा प्रकारांचा सचित्र पर्दाफाश यावेळी करण्यात आला .