पुणे- स्वारगेट ते कात्रज मार्गावर मेट्रोचा प्रकल्प उभारण्यासाठी या वाढीव मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 76.28 लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रशासनाचा ठराव स्थायी समितीने मान्य केला तसेच ओंकारेश्वर मंदिरातील 60 लाख रुपयांच्या सुशोभिकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.
स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या विस्तारीत मार्गिकेचा डीपीआर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून करून घेऊन हा डीपीआर करण्यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना अदा करण्यास व याबाबत करारनामा करण्यास स्थायी समितीची मान्यता देण्यात आली आहे.
महामेट्रोच्या पत्रानुसार स्वारगेट ते कात्रज अशा दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी सिस्ट्रा एइकम इजिस रिटस् या कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच काम करण्याची मुदत ही व्हेरिऐशन ऑर्डर दिनांकापासून 8 महिने इतकी आहे, तसेच या कामासाठी 76.28 लक्ष अधिक 12 टक्के जीएसटी इतका खर्च होणार आहे.
पुणे महापालिकेच्या या वर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आठ कोटी 76 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींमधून हा खर्च करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गिकेस यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली आहे. या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचा दुसर्या टप्प्यात समावेश करून त्याचा स्वतंत्रपणे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पुण्याच्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये जुने दगडविटाचे बांधकाम तोडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये नेवासा दगडातील पेव्हींग करणे, टिकवूडचा वापर करणे, पूर्वीच्या दगडी फ्लोअरींगला अॅशलर फिनिश देणे, दगडावरील ऑईल पेंट काढणे यासारखी कामे करण्यात येणार आहेत.
या कामांमुळे ऐतिहासिक ओेकारेश्वर मंदिराची दुरुस्ती होऊन ऐतिहासिक वास्तुचे जतन व संवर्धन होण्यास मदत होणार आहे. आगामी सहा महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी 59 लाख 75 हजार रुपयांचा खर्च येणार असून स्थायी समितीने या खर्चाला मंजुरी दिली आहे.