पुणे – देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग प्रकल्पाला काल महापालिकेच्या मुख्य सभेत उशिरा मान्यता देण्यात आली . कलम 72 “ब’ नुसार मांडलेला हाप्रस्ताव दप्तरी दाखल करा. ही कंपनी करारानुसार काम करते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी नगरसेवकांची समिती नेमा आणि पारदर्शकता आणा, या विरोधकांच्या मागण्या अमान्य करत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर या कंपनीसाठी पुढील चार वर्षे आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.देवाची उरुळी येथील कचरा डेपोमधील सुमारे 9 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून तेथील 20 एकर जागा रिक्त करण्याचे काम भुमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव यापुर्वीच स्थायी समितीने मान्य केला आहे. हे काम पुढील चार वर्षे सुरू राहणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुद करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल म्हणाले ,’ घनकचरा विभाग हा पोरासोरांचा कारभार झाला आहे. मुळात एक हजार चौ.फुटांपेक्षा अधिकची जागा आणि एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी ती द्यायची असेल तर, सर्वसाधारण सभेची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसे न करता शेकडो चौ.फूट जागा चार वर्षांसाठी ठेकेदाराला नाममात्र एक रुपये चौ.फूट भाडेदराने देण्यात आली आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्यात यावी. यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता ही कंपनी पारदर्शकपणे काम करते की नाही, हे पाहाण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक आणि कचरा डेपोप्रश्नी एनजीटीमध्ये दावा दाखल केलेल्या स्थानिक नागरिकांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. त्यांनी दर महिन्याला स्थायी समितीला अहवाल द्यावा. या कामाची फेरनिविदा काढावी व हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा,