‘बकासुराचा’अहवाल सभागृहात आला ..पण …(व्हिडीओ)
पुणे- भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे असंख्य अहवाल गिळून बसलेल्या महापालिकेने आज आणखी एक मोठ्ठा म्हणजे भ्रष्टाचाराचा बकासुर ठरलेल्या ‘देवदूत ‘ प्रकरणाचा अहवाल सभागृहात मुस्कटदाबी करत गुंडाळून नगरसचिव कार्यालयात पाठविला आहे .महापौर मुक्ता टिळक या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . त्यांच्या आदेशानेच हा अहवाल सभागृहात वाचून न दाखविता त्यावर चर्चा होवू न देता…ज्यांना पहायचा आहे त्यांनी हा अहवाल नगरसचिव कार्यालयात जावून पाहावा असे सांगत सभागृहातच या अहवालाची आणि एकूणच प्रकरणाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे .
या अहवालाचा मुद्दा नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज मुख्य सभेत उपस्थित केला , तेव्हा हा अहवाल आताच हाती आला असे सांगून त्यांना दुरूनच फाईल दाखविण्यात आली. पण नेमके या अहवालात काय दडले आहे हे सभागृहात मात्र उलगडू दिले गेलेले नाही .
गेली काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील नामांकित म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘सकाळ ‘या वृत्तपत्रातून महापालिकेच्या ‘देवदूत ‘ नावाच्या प्रकल्पात होणाऱ्या गैरबाबी चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत .या प्रकरणी चौकशी करून अहवाल १५ जुलै रोजी सभागृहात सादर करू असे जाहीर केले होते . आयुक्त खरोखर ‘बकासुराचा वध ‘ करणार कि क्लीन चीट देणार याबाबत उत्सुकता होती . मात्र महापौर यांनी एकूणच हे प्रकरण अशा पद्धतीने सभागृहात चर्चेला येण्यापासून आज थांबविल्याचे स्पष्ट झाले आहे.