पुणे : हवेली पूर्व भागात गावगुंडांच्या टोळक्याने उरुळी देवाची व वडकी परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या सहा दुकानांवर हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन पेट्रोल बॉम्ब व दगडफेक करीत बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धुमाकूळ घातल्याची घटना घडली. स्थानिक पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भयभीत झालेल्या पीडित व्यापाऱ्यांनी आज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधीत गावगुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उरुळी देवाची व वडकी परिसरातील किरकोळ व्यावसायिकांना हप्त्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी त्यास नकार दिला आणि त्यानंतर संबंधीत गावगुंडांनी थेट दुकानांवरच हल्ला चढविला व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद न आल्याने पीडित व्यापाऱ्यांनी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांच्यासमवेत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची आज दुपारी भेट घेतली. पाटील यांना घटनेसंदर्भातील सविस्तर निवेदन दिल्यानंतर त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचा व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ कडक कारवाईचे आदेश दिल्याने पीडित व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुणे शहराच्या उपनगरांमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या अनेक घटना घडत आहेत. दमदाटी करुन हप्ता मागणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दगडफेक करुन दहशत माजविणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांकडून व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि गावगुंडांवर कडक कारवाई व्हावी. ही आमची प्रमुख मागणी असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले.
उरुळी देवाची व वडकी परिसर हा नव्याने उदयास येत असलेली बाजारपेठ असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कापड, किराणा, स्वीट होम्स, सारखे अनेक व्यावसायिक व्यापार करण्यासाठी वास्तव्याला आहेत. परंतु, काही वर्षांपासून येथील व्यापाऱ्यांना स्थानिक गावगुंडांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. याविषयी संबंधीत पोलीस चौकीला तक्रार करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी योग्य तो न्याय मिळत नसल्याने येथील व्यापारी दहशतीच्या दडपणाखाली वावरत आहेत. या गंभीर विषयाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे लक्ष वेधून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, भागीरथ जांगीड, रमेश सोळंकी आदी व्यापारी उपस्थित होते.