पुणे : निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशानुसार मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम मार्केटयार्ड,पुणे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी १२५८ युनिट रक्त संकलन केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ.अजय चंदनवाले (अधिष्ठाता,जे.जे.हॉस्पिटल मुंबई), यू.टी.पवार (पोलीस अधीक्षक, पुनर्वसन विभाग,येरवडा),रितू छाब्रिया (मुकुल माधव फाउंडेशन), माधुरी मिसाळ (आमदार,पुणे), मुरलीधर तांबे (प्रभारी अधिष्ठाता बी.जे.मेडिकल कॉलेज),यांच्या उपस्थिती मध्ये झाले. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून भेट दिली.
मिशनद्वारे नोव्हेंबर १९८६ मध्ये पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराजांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली होती आणि संदेश दिला की ‘रक्त नाल्यामध्ये नाही तर नाड्यामध्ये वाहिले पाहिजे’.वर्ष १९८७ पासून हे शिबीर २४ एप्रिल या दिवशी मानव एकता दिवसानिमित्त आयोजित करण्यात येऊ लागले.
बाबाजींच्या या संदेशाने प्रेरित होऊन रक्तदानाला आपल्या भक्तीचे अंग बनवून श्रद्धाळू भक्त या महान अभियानामध्ये मोठ्या संख्येने योगदान देऊ लागले.
वर्ष १९८६ पासून आतापर्यंत ६०७६ शिबिरांचे आयोजन करून १० लाखाहून अधिक युनिट रक्तदान करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत २२ शिबिरांचे आयोजन करून ७००७ युनिट रक्तदान करण्यात आले असून या वर्षी पुण्यामध्ये २८ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅली चे आयोजन पुणे परिसरात केले होते या जागृती द्वारा प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध स्थरातील जागरूक नागरिकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार श्री.ताराचंद करमचंदानी (संत निरंकारी मंडळ, पुणे झोन इंचार्ज) यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील संयोजक, मुखी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान केले.