पुणे, दि. 24 : पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजदेयकांच्या थकबाकीपोटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. गेल्या 10 दिवसांत 3, 84,905 थकबाकीदारांचा वीजदपुरवठा खंडित करण्यात आला. त्यातील 3,05,986 थकबाकीदारांनी 74 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
गेल्या काही महिन्यांत पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलात थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्याचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी निर्देश दिले. त्यानुसार लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत 110 कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी पुणे परिमंडल- 71,946, बारामती परिमंडल- 1,50,585 व कोल्हापूर परिमंडलातील 1,62,374 अशा एकूण 3,84,905 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील 3,05,986 ग्राहकांनी 74 कोटी 70 लाख रुपयांच्या थकीत देयकांचा भरणा केला आहे व त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 79,853 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असून त्यांच्याकडे 35 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरु करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेली मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देयकांच्या आकारणीबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलास देण्यात आल्या आहेत. थकीत देयकांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
खंडित वीजजोडण्यांची
तपासणी करण्याचे निर्देश
थकीत देयकांमुळे खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलास करण्यात आलेल्या आहेत. सोबतच थकबाकीचा भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने सुरु करून देण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले आहेत.