पुणे, १९ जून: संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे गुरुवार, दि. २१ जून २०१९ रोजी सकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यावर्षापासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेतांना एका आठवड्यासाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात योग प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.
या शिबीराच्या निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे ५ ते ६ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबीरात सहभागी होणार आहेत.
पतंजली योगपीठ, हरिद्वार येथील आचार्य स्वामी विप्रदेवजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे. विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरीता योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन व्हावे यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात असलेल्या या योग प्रशिक्षण शिबीरात जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी केले आहे.