नाट्यशास्त्र, व्हिज्युअल इफेक्ट्स व मोशन ग्राफिक्स हा पदवी अभ्यासक्रम
पुणे :- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँन्ड टेलिव्हिजन शाखेतर्फे एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) या महाविद्यालयाची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. या महाविद्यालयात नाट्यशास्त्र या विषयात तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. तसेच व्हिज्युअल इफेक्ट्स व मोशन ग्राफिक्स या पदवी अभ्यासक्रमाचीही यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयटी एसएफटीचे अध्यक्ष आणि अधिष्ठाता डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, प्रा. समर नखाते, प्रा. बैजू कुरूप उपस्थित होते. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.
जब्बार पटेल म्हणाले, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा (नाट्यशास्त्र) हा अभ्यासक्रम बारावीनंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बीए इन ड्रामॉटिक आर्ट या विषयात विशेष अभिनय आणि थिएटर तंत्र या विषयावर अधिक भर देण्यात येणार आहे. थिएटर तंत्रज्ञानातील विशेषज्ञ, अभिनय, परिदृश्य (आर्किटेक्चर आणि स्पेस), व्हिज्युअल आर्ट्स, साहित्य आणि इतर परफॉर्मिंग आर्ट्स (संगीत, नृत्य व लोककला ) या विषयातील तज्ञांचे प्राध्यापकांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमासाठी मिळणार आहे. थिएटरच्या प्रत्येक पैलू शिकण्यासाठी लागणारे व्यावहारिक व नाट्यविषयक प्रशिक्षण आणि भारतातील व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विविध कलांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्यकला आणि भारतीय नाट्यकलेची सांगड या अभ्यासक्रमात घातली जाणार आहे.
व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्समध्ये या वर्षापासून पदवी अभ्यासक्रम ही या विभागात सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सिनेमा उद्योगांच्या गरजांनुसार तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरला वेगळे वळण देण्यासाठी हे शिक्षण महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष अनुभव प्रशिक्षणावर आमचा अधिक भर असणार आहे. चित्रपट क्षेत्राच्या गरजानुसारच व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून नाट्यशास्त्र या विभागात तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून विद्यार्थी घडविण्यावर आमचा भर राहणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्ञान आणि सर्जनशीलतेच्या मूल्यांसह विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. यासाठी नाट्यशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाची आम्ही सुरूवात करीत आहोत. तसेच सिनेमा उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची ही सुरूवात केली आहे. देशातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी याचा लाभ होणार आहे.
डॉ. सुनील राय म्हणाले, एमआयटी-एडीटी विद्यापीठात कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना बळ देण्यासाठी विविध अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. नाट्यशास्त्र विभाग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोशन ग्राफिक्स या पदवी अभ्यासक्रमांद्वारे चित्रपट व्यवसायाला लागणाऱ्या तांत्रिक बाबींसाठी कूशल मनुष्यबळाची निर्मितीस आमचा हातभार लागेल.