शरीर, मनाच्या तंदुरुस्तीसह सृजनशीलतेला प्राधान्य द्या- अभिनेता शर्मन जोशी
पुणे : “चित्रपट सृष्टीत येताना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त असणे फार गरजेचे आहे. आपला आहार, व्यायाम यावर नीट लक्ष देण्यासह आपल्यातील सृजनशीलता विकसित करत राहणे खूप महत्वाचे असते. या क्षेत्रात करिअर करताना संघर्ष करावा लागतो. तो करण्याचीही तयारी असावी,” असा सल्ला सिनेअभिनेता शर्मन जोशी याने विद्यार्थ्यांना दिला.
थ्री इडियट्समधील राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याने बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तामिळी अभिनेत्री ऐश्वर्या देवन, दिग्दर्शक धीरज कुमार, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी आणि कलाकारांशी झालेल्या संवादादरम्यान वेगवेगळ्या गप्पा रंगल्या. शर्मन जोशीने सांगितलेले अनुभव आणि थ्री इडियट्समधील ‘कम्मो की शादी हुई की नही?’ हा त्याचा संवाद (डायलॉग) ऐकून विद्यार्थी भारावून गेले. चित्रपट क्षेत्रातील करिअरविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी कलाकार आणि सिनेसृष्टीविषयी अभ्यास करुन साकारलेल्या पोस्टर्सने परिसर सजवला होता. हे सगळे पाहून कलाकार प्रभावित झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये वर्षभर विविध उपक्रम आयोजिले जातात. अनेक विद्यार्थ्यांत असलेल्या अंगभूत कलांना बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन बहुमोल ठरते.”