चारित्र्यवान नागरिक घडविण्याचा ‘माऊंट कार्मेल’चा प्रयत्न- सिस्टर निर्मलिनी ए. सी.
पुणे : “मुलींना शिक्षण मिळावे यासाठी मदर व्हेरोनिका यांनी माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलची स्थापना केली. गेल्या ७५ वर्षात हजारो मुली येथे शिकल्या. केवळ शालेय शिक्षण नाही, तर चारित्र्यवान नागरिक घडवण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिला आहे,” असे मत माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वरिष्ठ व्यवस्थापिका निर्मलिनी ए. सी. यांनी व्यक्त केले.
मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या लुल्लानगर येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजिका-सामाजिक कार्यकर्त्या आणि संस्थेच्या माजी विद्यार्थीनी लीला पुनावाला, हायस्कुलच्या प्राचार्या सिस्टर मरिसा ए. सी. व्यवस्थापिका सिस्टर मंजुषा ए. सी., कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख सिस्टर प्रिसिल्ला लोबो, प्रकाश लुल्ला यांच्यासह इतर मान्यवर व माजी विद्यार्थीनी, हितचिंतक, पालक आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार व रविवार या दोन दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मान्यवरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. शाळेतील जवळपास १३०० विद्यार्थिनींनी नृत्य, नाटक, गायन आदी कार्यक्रम सादर केले. अॅपोस्टॅलिक कार्मेलमधील सिस्टर्सचा समूह यासाठी स्वयंप्रेरणेने आणि नि:स्वार्थी भावाने प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजातील मुलींची ही शाळा असली तरी इतर समाजातील मुलींनाही त्यांच्या धार्मिक भावना आणि वैचारिक भूमिकेचा आदर ठेवून प्रवेश दिला जातो. मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी त्यांच्यात सामाजिक जाणीव रुजवण्यात संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.
सिस्टर निर्मलिनी ए. सी. म्हणाल्या, “कोणत्याही संस्थेसाठी ७५ वर्षांचा टप्पा महत्वाचा असतो. आपली कामगिरी तपासून पाहण्याची संधी असते. त्यातून आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. माऊंट कार्मेल शाळेतील सर्व सिस्टर, शिक्षक मातृत्वाच्या भावनेतून शिक्षण देऊन चारित्र्यवान माणूस घडविण्याचे काम करीत असून, ते काम यापुढेही अविरत चालू राहावे.”
सिस्टर मरिसा ए. सी. यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.