व्यंग्यचित्र, छायाचित्रांतून उलगडणार ‘पुलं’चे जीवन
साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुपतर्फे ७ ते ९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान प्रदर्शन
पुणे : साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंतुन त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंग्यचित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ फोटोबायोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दि. ७ ते ९ नोव्हेंबर २०१८ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, दि. ७ नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच गुरुवार, दि. ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘आनंदयात्रा’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे.
‘पुलं’चा जीवनप्रवास उलगडणारे आणि त्यातून खळखळून हसवणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व रसिक-साहित्यिक प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी कृष्णकुमार गोयल, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.