पुणे : “शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. पाण्याचे वाटप, रस्त्यांचे नियोजन, देखण्या इमारती आणि इतर अनेक गोष्टींचे ते शिल्पकार असतात. मात्र, बऱ्याचदा विभागांतर्गत समन्वयाचा अभाव दिसतो. परिणामी कामांना विलंब होतो. त्यामुळे अभियंत्यांनी नवनिर्मितीबरोबरच ‘सोशल इंजिनिअरिंग’ शिकावे व अधिकारी-अभियंत्यांनी एकदिलाने काम करावे,” असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिला.
अभियंत्यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’ शिकावे -राजेंद्र निंबाळकर
पुणे महापालिका अभियंता संघातर्फे गुणवंतांचा सत्कार
पुणे महानगर पालिका अभियंता संघातर्फे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त अभियंत्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राजेंद्र निंबाळकर बोलत होते. प्रसंगी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, सुनील कदम, शिवाजी लंके, सतीश भोसरेकर, वसंत पाटील, प्रदीप बेलदार, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, नरेंद्र वाघ, संजय पोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र निंबाळकर म्हणाले, “प्रत्येक कामात सुधारणेला वाव असतो. टीका होत राहणार आहे. त्यामुळे निराश न होता त्यात सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कामावर प्रेम असावे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’ वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आवश्यक तेथेच सल्लागाराची मदत घ्यावी. आपल्या कौशल्याचा योग्य उपयोग होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अंतर्गत संवाद गरजेचा असून, स्वतःवर विश्वास असावा.”
पराग करंदीकर म्हणाले, “नकारात्मक गोष्टीवर प्रहार करुन त्याला सकारात्मक करण्यासाठी माध्यमे प्रयत्न करत असतात. चांगल्या गोष्टींचा आपण सांगितल्या पाहिजेत. अभियंता शहराचा शिल्पकार असतो. भविष्यातील समस्या लक्षात घेऊन आपण तसे नियोजन केले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगले केले हे दाखवता आले पाहिजे. अभियंता कारकून होऊ नये, यासाठी अभियंता संघाने पुढाकार घेऊन कपॅसिटी बिल्डिंग करावी.”
सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. सिमरन पिरजादे यांनी आभार मानले.