कॉमर्स क्षेत्र म्हणजे करिअरच्या संधीचे भांडार
आयसीएआय‘तर्फे ‘कॉमर्स क्षेत्रातील करिअर’वर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
पुणे : “आर्थिक, व्यवस्थापकीय बाबींशी निगडित असलेल्या वाणिज्य क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. सनदी लेखापाल, वित्तीय अधिकारी, लेखापाल, कर सल्लागार या आणि अशा अनेक करिअरच्या वाटा कॉमर्स क्षेत्रात आहेत. सनदी लेखापाल ही परीक्षा अत्यंत कमी खर्चात आणि लागलीच अर्थार्जन देणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉमर्स क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा. करिअरच्या असंख्य संधी येथे उपलब्ध आहेत,” असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमात वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) चेअरमन सीए अभिषेक धामणे, सीए रिद्धी चांडक, सीए संकेत शहा व सीए पुष्कराज बेडेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
१० वी १२ वी झालेल्या विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला होता. या कार्यक्रमात सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीएनंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर एमबीए, एमएसडब्ल्यू, एमकॉम आणि इतर कर व्यवस्थापक वगैरेच्या संधींविषयी माहिती देण्यात आली.
सीए अभिषेक धामणे म्हणाले, “कॉमर्स कक्षेत्रात खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. सीएसारखे उत्तम करिअर करण्याचा मार्ग इथे सापडतो. सीए ही अतिशय स्वस्तात पूर्ण करता येणारी परीक्षा आहे. अतिसामान्य घरातील मुलेमुलीही या परीक्षेत यश मिळवतात. त्यासाठीची तयारी आपण ११ वी, बारावीपासूनच सुरु केली पाहिजे. आयसीएआय अशा परीक्षांसाठी सतत मार्गदर्शन करीत असते.”
अंजोर खोपडे हिने सूत्रसंचालन केले.