पंजाबी गायिका गिन्नी माहीने जिंकली रसिकांची मने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे बोपोडीत रंगला शाहिरी जलसा
पुणे : पहाडी आवाजातील भीमगीते, पंजाबी संगीतावरील भांगडा आणि गाण्यांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेले वंदन यामुळे पंजाबी गायिका गिन्नी माहीने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवत मने जिंकली. उपस्थितांतून होणारा टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्याही पाहायला मिळाला. गिन्नी माहीच्या पंजाबी बुद्ध आणि भीमगीतांनी बोपोडीकरांच्या मनावर मोहिनी घातली.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गीन्नी माही हिच्या बुद्ध, शिवराय, फुले, आंबेडकर यांच्यावर आधारित हिंदी-पंजाबी गीतांचा शाहिरी जलसा रंगला. गिन्नी माहीचा पुण्यात पहिल्यांदाच कार्यक्रम असल्याने तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. बोपोडीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो पुणेकरांनी उपस्थिती लावली. सांस्कृतिक महोत्सव समितीचे प्रमुख परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, निवेदक दीपक म्हस्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘बाबासाहेब तुझको है प्रणाम मेरा’, ‘भीमा तेरे सोच को सलाम’, ‘नमो बुध्दाय नमो नमो’, ‘बाबा लिख दिया ऐसा संविधान’, ‘आँखो में बुद्ध, बातोमे बुद्ध’, ‘रमाबाई तेरे चरणो में सजदा सोसो बार करूं’, ‘फॅन बाबासाहब दी’ यासह बहारदार भीमगीते सादर करत गिन्नी माहीने अक्षरक्ष: खिळवून ठेवले. आपल्या सादरीकरणात रसिकांना सामावून घेत भांगडा नृत्यावर ठेका धरायला लावला. हिंदी-पंजाबी गीतांच्या नजराण्याने बोपोडीकरांचे कान तृप्त झाले. सूत्रसंचालन गौरवकुमार, दीपक म्हस्के यांनी केले. तबल्यावर सरबजीत, कीबोर्डवर धर्मेंद्रसिंग, ढोलकीवर संदीपकुमार, गिटारवर कांचन लिंबाळकर यांनी साथसंगत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व सन्मानाने जगत आहोत. त्यांच्या कर्मभूमीवर येऊन माझी कला सादर करण्याची संधी मला मिळाल्याने खूप आनंदित झाले आहे. आयुष्यभर गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, तत्वज्ञान जगभर पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहे, अशी भावना गिन्नी माही हिने यावेळी व्यक्त केली.