‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या सुरावटींनी दुमदुमला आसमंत
बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित धम्मपहाटमध्ये राहुल देशपांडे यांचे गायन, रोणु मुजुमदार यांचे बासरीवादन
पुणे : सप्तसुरांतून उमटलेल्या ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा नादाने अवघा आसमंत दुमदुमला. पंडित राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने आणि रसिकांना मोहिनी घालणाऱ्या पंडित रोणू मुजुमदार यांच्या सुमधुर बासरीवादनाने गौतम बुद्धाना स्वरांतून मानवंदना देण्यात आली. त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या शनिवारची सकाळ स्वरमयी झाली. या धम्मपहाट कार्यक्रमाला संयोजक परशुराम वाडेकर यांच्यासह मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पंडित वसंतराव गाडगीळ, टेक्सास विद्यापीठाचे प्रा. स्कॉट, प्रा. विजय खरे, नगरसेविका सुनीता वाडेकर व राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बुद्ध जयंतीच्या (बौद्ध पौर्णिमा) निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे धम्मपहाट महोत्सवाचे आयोजन केले होते. धम्मपहाट महोत्सवाचे हे अठरावे वर्ष असले, तरी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय संगीताची मैफल आयोजिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगलेल्या या मैफिलीत राहुल देशपांडे यांनी गायनातून, तर रोणू मुजुमदार यांनी बासरीतून सादर केलेल्या रागदारीने रसिकांना भुरळ घातली. त्यात भर घालण्याचे काम गौरव महाराष्ट्राचा फेम गायक सिद्धेश जाधवने केले.
देशपांडे व मुजुमदार यांनी स्वरमालेतून भूप रागाने गायनाला सुरुवात करत ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ हे वंदन गायले. त्यानंतर तीन ताल बंदिश सादर केली. अहिर भैरव रागातील रोणुजी आणि राहुलजी यांच्या मिश्र सादरीकरणाने रसिकांना मोहिनी घातली. दोघांनी एकमेकांना दिलेली उत्स्फुर्त दाद हा क्षण रसिकांना देखणा होता. ‘घेई छंद मकरंद’, ‘अलबेला सजन आयो रे’ या बंदिशीने आणि सुनता है गुरु ग्यानी या संत कबीरांच्या दोह्याने रसिकांनाही ठेका धरायला लावला. ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा’, ‘चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया’ ही दोन गीते सिद्धेश जाधव याने सादर केली. तबल्यावर निखील फाटक यांची, तर पखावजावर ओंकार दळवी, कीबोर्डवर विशाल धुमाळ यांची तालबद्ध साथसंगत झाली. दीपक म्हस्के यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कबीराचे निर्गुण भजन गात भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.