अभ्यासातील सातत्य, सराव हेच यशाचे गमक-शादाब हुसेन
पुणे : “कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासातील सातत्य, सराव हेच यशाचे गमक असते. नियोजनबद्ध अभ्यास, नियमित केलेला सराव, स्वयंअध्ययन आणि बदलत्या गोष्टींबाबत स्वतःला ‘अपडेट’ ठेवल्यानेच कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल परीक्षेत प्रथम क्रमांकाचे यश मिळवू शकलो. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य आणि सरावाला महत्व द्यावे,” असा सल्ला सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला आलेल्या राजस्थान येथील सीए शादाब हुसेन याने विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यातील व्हीस्मार्ट अकॅडमीतर्फे सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला आलेल्या शादाब हुसेन व संयुक्तपणे तिसरा आलेले सीए जय बोहरा आणि सीए पुलकित अरोरा यांच्यासह गुणवत्ता यादीत आलेल्या ३६ यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. शिवदर्शन पर्वती येथील मुक्तांगण शाळेच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी व्हीस्मार्ट अकॅडमीचे संस्थापक सीए विशाल भट्टड, संचालक राजेश राकेश, संचालक डॉ. उज्ज्वल भट्टड, संचालिका भारती राकेश सीए प्रा. दर्शन खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ‘सार्थक’ संस्थेला एक लाखाची देणगी व्हीस्मार्ट अकॅडमीच्या वतीने देण्यात आली.
शादाब हुसेन म्हणाला, “सीएची परीक्षा दहावी-बारावीपेक्षाही कठीण आहे. १२-१३ तासांचा अभ्यास, नवीन माहितीची जाण, भाषेवरील प्रभुत्व आणि तणावमुक्त सराव यामुळे यशस्वी झालो. इतर शाखेतील मुलांशी संवाद साधला, तर अभ्यासातील ताण कमी होतो. व्हीस्मार्ट अकॅडमीने सरावासाठी भरपूर साहित्य आणि मार्गदर्शन दिल्याचा मला फायदा झाला.”
पुलकित अरोरा म्हणाला, “कठोर परिश्रम घेतले, तर यश हमखास मिळते. आत्मविश्वास आणि प्रोत्साहन गरजेचे असते. शिवाय, अशा स्पर्धात्मक परीक्षांत ‘शॉर्टकट’ नसतो. त्यामुळे आपल्यातील क्षमता ओळखून जे विषय अवघड वाटतात, त्यावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा. सातत्य आणि इच्छाशक्ती आपल्याला यशाच्या शिखरावर नेते.”
सीए विशाल भट्टड म्हणाले, “सीए परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांकडून प्रेरणा मिळावी. त्यांच्या यशाचा मार्ग समजावा, या उद्देशाने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाच्या पद्धती व्हीस्मार्ट पुरवते. व्हीस्मार्ट’च्या माध्यमातून देशात ३६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केला, ही अभिमानाची बाब आहे.”
सीए विजय सारडा व मुग्धा गोखले यांनी सूत्रसंचालन केले. सीए दर्शन खरे यांनी आभार मानले.