गुणवत्ता, सेवा व सचोटी ही यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री -अरुणा भट
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे तीन दिवसीय ‘भारी-भरारी’ महोत्सव
पुणे : “कोणताही उद्योग करताना गुणवत्ता, ग्राहकाभिमुख सेवा आणि कामातील सचोटी महत्वाची असते. याच त्रिसूत्रीच्या जोरावर अनेक उद्योजकांनी यशाची शिखरे गाठल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आजचा छोटा व्यावसायिक उद्याचा उद्योजक होणार असतो. अशा प्रकारच्या ‘एक्स्पो’मधून उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास मदत होते,” असे मत ‘केप्र’ मसालेच्या संचालिका अरुणा भट यांनी व्यक्त केले.
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ आयोजित तीन दिवसीय ‘भारी भरारी’ या फन-फूड महोत्सवाचे उद्घाटन अरुणा भट व पीएनजी ग्रुपच्या वैशाली गाडगीळ यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी श्रीपाद करमरकर, मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष संजय जोशी, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, धनंजय देशपांडे आदी उपस्थित होते.
वैशाली गाडगीळ म्हणाल्या, “आपल्या उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर व्यवसायाची दिशा अवलंबून असते. प्रत्येक ग्राहक जोडला जातो आणि त्यातून उद्योग उभा राहतो. त्यामुळे ग्राहकाशी प्रामाणिक राहणे आणि त्याला उत्तम सेवा देणे हेच उद्योगाला यशाकडे नेण्यास उपयुक्त ठरते. या प्रदर्शनात अनेक गृहिणी आपल्यातील व्यावसायिक पैलू उलगडत आहेत. नावीन्य आणि ग्राहकाशी सुसंवाद याचेही महत्व आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
रविवार, दि. १३ जानेवारी २०१९ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. जवळपास २०० च्यावर स्टॉल्स असणार आहेत. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शो, तर मनीषा लताड आणि सहकाऱ्यांचा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.
खवैय्यांसाठी खाद्यांची पर्वणी
महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन, फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल.