१४७ गरजू रुग्णांचे कृत्रिम पायरोपण
लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन
पुणे : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित दोन मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिरात १४७ रुग्णांना कृत्रिम पाय (जयपूर फूट) बसविण्यात आले. याचबरोबर ५३ पोलिओ कॅलिपर्स, २५० पेक्षा जास्त सिंगल स्टिक, नीकॅप, सर्जिकल बूट, कुबड्या व कंबरपट्टा आणि दोन व्हीलचेअर व एक तीनचाकी सायकलचे वाटप या शिबीरात करण्यात आले.
महावीर प्रतिष्ठान, महर्षीनगर पोलीस चौकीजवळ, सॅलिसबरी पार्क येथे या पुणे येथे ५ व ६ जानेवारी रोजी झालेल्या या दोन दिवसांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, जयपूर फूटचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दीपक शेटिया, राजेंद्र गोयल, वीरेंद्र पटेल, शरद पवार, प्रवीण ओसवाल, तुषार मेहता, सतीश राजहंस, सुनील शेटिया आदी पदाधि कारी उपस्थित होते.
रमेश शहा म्हणाले, “सामाजिक सेवेत लायन्स क्लब नेहमीच पुढाकार घेत असून, हे ५३ वे शिबीर होत आहे, याचा आनंद वाटतो. समाजातील गरजूना, वंचित घटकांना चांगल्या रीतीने आयुष्य जगता यावे, यासाठी लायन्सचे सर्व पदाधिकारी नेहमी प्रयत्नशील असतात. लायन हसमुख मेहता यांनी जयपूर फूट शिबिराची सुरुवात केली. आज हजारो दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम लायन्स क्लबने केले आहे.
दीपक सेठिया म्हणाले, “यंदाच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० लोकांनी याचा लाभ घेतला. फाटलेले किंवा विद्रुप असलेल्या ओठ, कान व नाक यावर मोफत शल्य चिकीत्सा शिबीरातही रुग्णांनी सहभाग घेतला. हे शिबीर संपूर्णतः मोफत होते. बाहेरगावच्या रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. आमच्या सर्व स्वयंसेवकांनी अतिशय चांगले नियोजन केले.”