पुणे– सन 2018-19 या वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये (आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरुर आणि वेल्हे) चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये सदर तालुक्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत 100 टक्के अनुदानावर पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या योजनेकरिता पुणे जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रु. 70 लक्ष इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक/शेतकरी यांच्याकडे किमान 10 गुंठे जमीन उपलब्ध आहे, तसेच सिंचनसुविधा उपलब्ध आहे त्यांना 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते (प्रती 10 गुंठे रक्कम रु 460/- च्या मर्यादेत) अनुदान अनुज्ञेय असेल.
सदर योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी 29 ऑक्टोंबर ते 12 नोव्हेंबर 2018 असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक/शेतकरी यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पुणे यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुशसंवर्धन खात्याचा टोल फ्री क्र. 18002330418 क्रमांकावर संपर्क साधावा.