पुणे,दि.15 :- मतदार यादीमध्ये नांव असल्याशिवाय मतदारांना मतदान करता येत नाही. निवडणूक विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली तसेच वगळण्यात आलेली नावे याची माहिती होण्यासाठी, राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांची नेमणूक करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
1 सप्टेंबर,2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीसंबधी विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार, आमदार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अनिल शिरोळे, आ.योगेश टिळेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी, 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार यादीमध्ये नोंद करण्यासाठी निवडणूक विभागासह राजकीय पक्षांनी विशेष प्रयत्न करावे असे सांगितले. प्रारुप मतदार यादीमधील त्रुटी अथवा बदलाबाबत सूचना करावी, असे आवाहन राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांनी केले.
मतदान केंद्र स्थापन करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण, दुबार मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीत नांव नोंदविणे, छायाचित्रासह ओळख पत्र तयार करणे, मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम आदि विषयांवर यावेळी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी विभागीय आयुक्तांनी संवाद साधला. त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हयातील निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.