पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला असून मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याची माहिती निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बापट यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बापट यांनी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार फेर्या पूर्ण केल्या आहेत. सर्व मतदारसंघातील विभागीय कार्यालये कार्यान्वित झाली असून, त्या मार्फत प्रभागनिहाय प्रचाराचे नियोजन पूर्ण झाले आहे.
शहरात एकूण १९४४ बूथ असून १८०६ बूथप्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. ४१६ शक्तीकेद्रांपैकी ४०६ शक्तीकेंद्राच्या प्रमुखांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. भाजप वॉर रूमच्या माध्यमातून पंचवीस हजार कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरणार आहे. बूथप्रमुखांच्या माध्यमातून शासनाच्या योजना, पत्रक वाटप, मतदार स्लिप वाटप, मोबाईल ऍपद्वारे मतदार यादीतील नाव व केंद्राची माहिती देणे अशाप्रकारची कामांना या काळात प्राधान्य देण्यात येणार आहेत.
प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या दुसर्या फेर्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. या टप्प्यावर बापट यांच्या परिचय पत्रकांचे घरोघरी वाटप, शासनाच्या योजना पोहोचविणे, जाहीरनामा निर्मिती आदी कामे करण्यात येणार आहेत. केंद्र व प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (९ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता चंदननगर भाजी मंडई, नगर रस्ता येथे आणि महात्मा फुले विद्यालय, नाना पेठ, क्वार्टर गेट येथे रात्री ८ वाजता जाहीर सभा घेणार आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांची सभा १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नेहरू मेमोरिअल हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
दुसर्या टप्प्यात महायुतीच्या वतीने २०० कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिलपासून या सभांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या स्टार प्रचारक निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शाम देशपांडे, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, अशोक हरवाणळ, बाळा ओसवाल, प‘वी जावळे, विशाल धनावडे, पृथ्वीराज सुतार, डॉ. अमोल देवळेकर, संजय सोनावणे असे पन्नास स्टार प्रचारक शहरातील वस्ती व सोसायट्यांमध्ये प्रचार करणार आहेत.