पुण्यासाठी कबूल केलेली कामे मार्गी लावली -गडकरी (व्हिडीओ)
पुणे- पुण्याकरीता मी जी जी कामे कबूल केली होती ती आजपर्यंत मार्गी लावलीत असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात नगरसेवक हेमंत रासने मित्रपरिवाराच्या वतीने ,माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीदिनी आयोजित रक्तदान महाशिबिराचे उद्घाटन करताना दिले .यावेळी आज ५ हजार रक्तदाते ५ हजार बाटल्या रक्तदान करतील असा संकल्प नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारातर्फे करण्यात आला आहे. हे शिबीर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेमध्ये आहे .या शिबिराच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री गिरीश बापट ,भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले,खासदार अनिल शिरोळे,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर पदाधिकारी नगरसेवक यावेळी उपस्थित होते .
शहरासाठी सांगितलेली सर्व कामे मी पूर्ण केली आहेत, असे सांगून यावेळी नितीन गडकरी म्हणाले, की पुण्यात येण्यापूर्वी चांदणी चौकातील पुलाचे काम सुरू झाले नव्हते. कारण त्याकरता लागणारी जमीन अधिग्रहण झाली नव्हती. ८० टक्के पैसे मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. मात्र, माझा पुणे दौरा निश्चित झाला तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिली, की मी पुण्यात जाण्यापूर्वी ठेकेदाराला वर्कऑर्डर मिळाली पाहिजे. त्यानंतर काही वेळातच त्यांना वर्कऑर्डर मिळाली. आता उद्यापासून कामाची जोरात सुरवात होईल, असे त्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जानेवारी महिन्यात सुरु करणार आहोत. तसेच साताऱ्यातील खंबाटकी घाटातील ६ लेनच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान महाशिबिरात ससून ब्लड बँक ,पी एस आय ब्लड बँक ,जनकल्याण रक्तपेढी -पुणे- नगर- जालना ,घोलप ब्लड बँक,भारती ब्लड बँक अशा विविध रक्तपेढ्या यात सहभागी झाले आहेत.गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते,महाविद्यालयीन तरुण आणि असंख्य नागरिक यावेळी रक्तदान करत आहेत .