60 एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या “मिशन स्वप्नपूर्ती” अंतर्गत आखली मोहीम
स्टोक बेसकॅम्पवर चढाई करणारा सर्वात कमी वयाचा मुलगा
मुलाच्या स्वप्नासाठी वडील सुधीर कवडे यांचाही या मोहिमेत सहभाग
पुणे: साई कवडे या 9 वर्षाच्या चिमुकल्याने इतिहास घडवत लेह-लडाख येथे स्टोक कांगरी बेसकॅम्प ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करत 16,339 फुटांवर भारताचा तिरंगा फडकवला आहे. भारताचा तिरंगा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवत साई कवडे या बेसकॅम्प वर पोहचनारा सर्वात कमी वयाचा मुलगा ठरणार आहे. 360 एक्सप्लोरर या महाराष्ट्रातील आघाडीच्या ग्रुपने “मिशन स्वप्नपूर्ती” अंतर्गत ही मोहीम आखली होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व साई चे वडील सुधीर कवडेही या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
यापूर्वी साईने महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले सर केले असून लिंगाणा या अतिशय अवघड चढाईही त्याने पूर्ण केली आहे. गेले 6 महिने साई ने विविध कसरती करत या मोहिमेची तयारी केली होती. या मोहिमेसाठी शाररिक व मानसिक भक्कमतेसाठी विविध ध्यान प्रकारही साई ने केले होते. सर्व टेक्निकल बाबीमध्ये महाराष्ट्रातील जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके उंचीवरील एक्सपर्ट डॉक्टर डॉ. नरेंद्र पाटील व डॉ. भूषण यांनीही मार्गदर्शन केले होते. या मोहिमेसाठी खास नेपाळवरून फुरबा व लेह मधील सॅम असे दोन शेर्पा साई कवडे सोबत होते.
30 सप्टेंबर रोजी ही मोहीम सुरू झाली होती. अत्यंत कमी ऑक्सिजन असलेल्या लेह भागात अवघड चढाईत 9 वर्षाच्या साईने सातत्यपूर्ण चालीने 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता बेसकॅम्प वर यशस्वी आरोहण केले.
360 एक्सप्लोरर ग्रुपचे हे सर्वात मोठे यश असून 9 वर्षाच्या साईच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्व तांत्रिक बाबी 360 एक्सप्लोरर मार्फ़त पूर्ण केल्या गेल्या होत्या.
पुढे साई हिमालयातील अनेक शिखरे सर करणार असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल असे साई चे वडील सुधीर कवडे यांनी सांगितले. साई सध्या बालेवाडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये चवथी मध्ये शिकत आहे.
साई कवडे-
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा व वडील सुधीर आणि आई केतकी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश मिळवू शकलो. सह्याद्री मध्ये खूप भटकंती केली आहे. हिमालयात प्रथमच जाऊन एव्हडी उंची गाठली म्हणून मला खूप आनंद होत आहे. आनंद बनसोडे, फुरबा शेर्पा व सॅम यांच्या मुले एव्हडे मोठे यश मिळवू शकलो.
सुधीर कवडे(साई चे वडील)-
लहान वयात साई ने जो इतिहास घडवला आहे त्यामुळे खूप समाधान होत आहे. त्याच्या आयुष्याच्या दृष्टीने हा खूप मोठा अनुभव असणार आहे. इथून पुढे साईने अनेक मोठमोठ्या शिखरांवर तिरंगा फडकवावा अशी इच्छा आहे. एव्हड्या कमी ऑक्सिजन मध्ये साई तग धरून राहिला व ही उंची गाठल्याबद्दल खूप आनंद होत आहे. माझ्या सर्व मित्रांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे.
आनंद बनसोडे( 360 एक्सप्लोरर प्रमुख)-
360 एक्सप्लोरर मार्फ़त अनेकांच्या स्वप्नपूर्तीसाठी अश्या मोहीमा आखल्या जात आहेत. साई ने लहान वयात जे करून दाखवले आहे तो एक इतिहास आहे. त्याच्यापासून अनेक लहान मुले व पालक प्रेरणा घेतील व मुलांना साहसी खेळाकडे सकारात्मकपणे पाहण्यासाठी प्रेरित करतील असा विश्वास मला वाटतो. ज्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकांना त्रास होतो ते साई ने करून दाखवले आहे. साई आणि त्याचे वडील सुधीर कवडे यांचे खूप खूप अभिनंदन.