गुरुपौर्णिमेनिमित्त उद्गारतर्फे ‘ अर्पण ‘ मैफलीचे आयोजन
पुणे : गुरू पंडिता रोहिणीताई भाटे यांच्या कथक कलेचा वारसा ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये नि:स्वार्थ भावनेने पुढे नेत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्गार संस्थेने येत्या गुरुवारी (दि.११) ‘ अर्पण ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोथरुड येथील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल रंगणार आहे.
‘ अर्पण ‘ कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहिणी ताई व नीलिमा ताईंना नृत्यरुपी गुरुदक्षिणा अर्पण करण्याच्या उद्गारच्या संचालिका आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांचा मानस आहे. या कार्यक्रमात पंजाब घराण्याचे विख्यात तबलावादक पंडित योगेश शम्सी यांचे सुश्राव्य तबलावादन अनुभवण्याची संधी देखील रसिकांना लाभणार आहे.
कथक नर्तिका गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांनी कथक परंपरेला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. हा वसा निरपेक्ष भावनेने, कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय गेली कित्येक वर्षे नीलिमाताई अध्ये नेटाने पार पाडत आहेत. त्यांच्या या निरलस कार्याची दखल घेतली जावी, हा देखील या मैफलीचा हेतू आहे.