पुणे: बँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनने ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून बँकेचा 112वा स्थापना दिन साजरा केला.
विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये अंदाजे 250 कर्मचारी सहभागी झाले होते. ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र उच्च शिक्षण व माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयात वृक्षलागवड करण्यात आली, तसेच निवारा वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजन आयोजित केले होते.
सर्वांचे ऋण मानताना, बँक ऑफ बडोदाचे पुण्याचे झोनल हेड के. के. चौधरी यांनी सांगितले, “112 वर्षांच्या वाटचालीचा एक भाग असणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आमच्या ग्राहकांबरोबर व कर्मचाऱ्यांबरोबर स्थापना दिन साजरा करणे गौरवाचे आहे. आपण सर्वांनी इतकी वर्षे आमच्यावर दाखवलेला विश्वास अतिशय मोलाचा आहे आणि यापुढेही आम्हाला तुमची साथ हवी आहे. आम्ही यापुढेही सर्वोत्तम सेवा देणार आहोत आणि सर्व ग्राहकांना बँकिंगचा उत्कृष्ट अनुभव देणार आहोत.”