पुणे : चिखलीतील मोईफाटा येथील मेसर्स सनशाईन पॉलीमर्स कारखान्यात 1 लाख 09 हजार 699 युनिटची म्हणजे 14 लाख 35 हजार 710 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी महावितरण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 14) एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत चिखलीमधील मोईफाटा येथे हेशम अख्तरखान यांच्या मालकीच्या सनशाईन पॉलीमर्स कारखान्याला महावितरणने औद्योगिक वीजजोडणी दिलेली आहे. या कारखान्यातील वीजवापराच्या विश्लेषणातून वीजवापराच्या नोंदीबाबत शंका निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आले व कारखान्यात 1,09,699 युनिटची म्हणजे 14,35,710 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अविनाश श्रीगडीवार, सहाय्यक अभियंता शितल बोथे, विक्रांत गरूडे तसेच जनमित्र नितीन पायघन, विजय अत्तारकर, राहुल भुसा, गणेश हुले, बालाजी गित्ते आदींनी ही वीजचोरी उघडकीस आणली.
या वीजचोरीप्रकरणी सनशाईन पॉलीमर्स कारखान्याचे संचालक हेशम अख्तरखान विरुद्ध गुरुवारी (दि. 14) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.