चेन्नई,- टीव्हीएस मोटर कंपनी या जगातील प्रतिष्ठित टू-व्हीलर व थ्री-व्हीलर उत्पादकाने कंपनीचे पूर्ण वेळ संचालक या पदी आज के. एन. राधाकृष्णन यांची नियुक्ती केली. राधाकृष्णन 23 ऑक्टोबर 2018 पासून पाच वर्षे कालावधीसाठी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत.
त्यांनी 1986 मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (1986) म्हणून सुंदरम क्लेटॉन येथे करिअर सुरू केले आणि त्यांनी समूहामध्ये बिझनेस प्लानिंग व टीक्यूएम प्रमुख म्हणून प्रगती केली. हे पद भूषवत असताना त्यांनी प्रतिष्ठेचे डेमिंग प्राइझ जिंकण्यासाठी सुंदरम क्लेटॉनचे नेतृत्व केले. हे बक्षीस जिंकणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली. 2004 मध्ये, त्यांना टीव्हीएस मोटरचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली व 2008 मध्ये ते अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली, टीव्हीएसने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकला जाणारा टू-व्हीलर ब्रँड म्हणून स्थान मिळवले. गेली सलग तीन वर्षे, टीव्हीएस मोटरला जे. डी. पॉवरने कस्टमर सॅटिसफॅक्शन यासाठी टू-व्हीलर श्रेणीमध्ये पहिला क्रमांक दिला आहे, तसेच कंपनीच्या व्यक्तिगत उत्पादनांना गुणवत्ता व ग्राहकांची पसंती या बाबतीत श्रेणीतील आघाडीची म्हणून गौरवले आहे. कंपनीने अलीकडेच टीव्हीएस अपाचे आरआर 310 दाखल करून सुपर प्रीमिअम श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. राधाकृष्णन यांनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारांत टीव्हीएसचा विस्तार करण्यासाठी नेतृत्व केले आहे. गुणवत्तेला महत्त्व, ग्राहकांप्रती पॅशन, काटेकोर नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब यासाठी राधाकृष्णन नवाजले जातात.
या नियुक्तीविषयी, टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले, “के. एन. राधाकृष्णन यांच्याकडे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची सूत्रे देताना टीव्हीएस मोटर कंपनीला अतिशय आनंद होत आहे. गेल्या काही दशकांत, त्यांनी दर्जेदार उत्पादनांचा जागतिक उत्पादक बनण्याच्या दिशेने सुरू असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीच्या वाटचालीला योग्य आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीला लक्षणीय मैलाचे टप्पे साध्य करण्यासाठी, त्यांचा कंपनीतील प्रदीर्घ अनुभव व ऑटोमोबाइल उद्योगातील प्रतिष्ठेचे स्थान मोलाचे ठरणार आहे. भविष्यात कंपनीला आणखी उंचीवर नेण्यासाठी ते कंपनीचे सक्षम नेतृत्व करतील, याची खात्री आहे.”
के. एन. राधाकृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी), चेन्नई येथून मास्टर्स डिग्री घेतली आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), अहमदाबाद येथून मॅनेजमेंट एज्युकेशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.