मुंबई: येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड या येस बँकेच्या संपूर्ण मालकीच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मर्चंट बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट व ब्रोकिंग उपकंपनीने ब्रोकिंग व्यवसायासाठी अध्यक्ष व संशोधन प्रमुख यापदी अमर अंबानी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
अमर यांच्याबरोबर, संस्थात्मक ग्राहक व अल्ट्रा एचएनआय गुंतवणूकदार यांच्यासाठी अनेक यशस्वी मिडकॅप स्टॉक कल्पना मांडण्याचे श्रेय असणारी 15 पुरस्कारविजेत्या विश्लेषकांची टीमही रुजू झाली आहे. संशोधन प्रमुख ही नवी भूमिका बजावत असताना, अमर इन्स्टिट्यूशनल इक्विटीज व्यवसाय सक्षम करण्यासाठी, तसेच वेल्थ मॅनेजमेंट, वेल्थ ब्रोकिंग व इन्व्हेस्टमेंट अडव्हॉयजरी यामध्ये वाढ करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांची विश्लेषकांची टीम बीएफएसआय, फार्मा, टेलिकॉम/मीडिया, मेटल्स व कमोडिटीज, करन्सी व डेरिव्हेटिव्ह अशी महत्त्वाची क्षेत्रे समाविष्ट करणार आहे व मिड-कॅप्सवर विशेष भर देणार आहे.
येस सिक्युरिटीजमध्ये येण्यापूर्वी, अमर आयआयएफएल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स येथे भागीदारी व संशोधन प्रमुख होते. आयआयएफएलमधील 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी संशोधनविषयक धोरण आखणे, वैविध्यपूर्ण गुंतवणूक योजना व उत्पादने तयार करणे, ब्रोकिंग धोरण आखणे व डिजिटल उपक्रम तयार करणे या बाबतीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सल्लाविषयक संस्कृती जोपसण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. आयआयएफएलमध्ये पदभार सांभाळत असताना, अमर यांनी गुंतवणूक समितीचीही सुरुवात केली. ही समिती संपत्तीवर्गांविषयी मते व संपत्ती विभाजन याविषयी मार्गदर्शन करायची.
फायनान्समध्ये एमबीए केलेले अमर बिझनेस प्रोसेस री-इंजिनीअरिंगमध्येही सर्टिफाइड आहेत.
याविषयी बोलताना, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष राणा कपूर म्हणाले, “येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडच्या प्रवासामध्ये अमर अंबानी व त्यांच्या टीमचे स्वागत आहे. बाजाराच्या उपलब्धतेला व संपादन क्षमतांना चालना देण्यासाठी, तसेच त्यामुळे मर्चंट बँकिंग व्यवसायालाही यश मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. परिपूर्ण संशोधन विभाग सुरू झाल्याने कंपनीला ज्ञान व संशोधन-प्रणित दृष्टिकोन अंगिकारता येईल. तसेच, ब्रोकिंग, सल्लासेवा, संस्थात्मक विक्री व मर्चंट बँकिंग व्यवसाय यांच्यासाठीही मदत होईल.”
याविषयी बोलताना, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिडचे अध्यक्ष व संशोधन प्रमुख अमर अंबानी यांनी सांगितले, “येस बँकेच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी मी अप्रतिम मूल्य व उत्कृष्ट उत्पादने देण्यासाठी उत्सुक आहे. संस्थात्मक श्रेणीसाठी, आम्ही आणखी सखोल विचार करणार आहोत आणि कॉर्पोरेट सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेल्थ व रिटेल श्रेणीसाठी, संपत्ती विभाजनाबाबत मार्गदर्शनाद्वारे, त्यानंतर साधनाची निवड व मागणीनुसार सल्ला याद्वारे गुंतवणुकीसाठी उत्तेजन देणार आहोत.”
येस बँकेने या व्यवसायाप्रति बांधिलकी अधोरेखित करत व ग्राहकांना परिपूर्ण सेवा देत, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडला अलीकडेच अतिरिक्त 99 कटी रुपयांचे भांडवल दिले असून, एकूण प्रोव्हिजनल नेट-वर्थ (ऑक्टोबर 31, 2018 रोजी) 154 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.