पुणे: साथसंगत करणा-या कलाकारांची गायन कला सर्वांसमोर यावी या उद्देशाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘संगत – संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २१ व २२ जानेवारी रोजी शिवाजीनगर जवळील राहुल थिएटर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. यासंदर्भात आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकाद्वारे माहिती कळविली आहे.
याबरोबरच याच कार्यक्रमा दरम्यान रविवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता सवाई स्मारक येथेच पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली म्हणून पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, लक्ष्य व आयुष मोहन गुप्ता, प्रवीण गोडखिंडी व त्यांचे पुत्र षड्ज आपली कला सादर करणार आहेत हर विशेष.
या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले की, गायकाला साथसंगत करणा-या कलाकारांना गायन कला अवगत असतेच. ते स्वत: गायक असतात. मात्र ही कला कधीच रसिकांपर्यंत पोहोचत नाही. हीच कला रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही ‘संगत- संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. साथसंगत करणारे कलाकार हे अनेक वर्ष गायकाला साथसंगत करीत असतात त्यामुळे गायकाच्या गायकीतील बारकावे त्यांनी आत्मसात केलेले असतात. स्वत:ची गायकी आणि त्याला मिळालेले असे कलाकाराचे कोंदण यामुळे अधिक खुलते असा अनुभव आहे. साथसंगत करणा-या कलाकारांची हीच कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांसमोर येईल असा आम्हाला विश्वास आहे.
पं भीमसेन जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त होणा-या या कार्यक्रमाचा पहिल्या दिवशी (शनिवार दि. २१ जानेवारी) रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध तबलावादक प्रशांत पांडव हे आपली कला सादर करतील. त्यानंतर जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि प्रसिद्ध संवादिनीवादक अविनाश दिघे आपली कला सादर करतील. पहिल्या दिवसाचा समारोप प्रसिद्ध पखावज वादक अखिलेश गुंदेचा यांच्या गायनाने होईल.
महोत्सवाच्या दुस-या दिवशी (रविवार दि. २२ जानेवारी) संवादिनीवादक सुयोग कुंडकर, तबलावादक पं. रामदास पळसुले आणि भरत कामत आपली गायन कला सादर करतील.
यावेळी बोलताना पं. रामदास पळसुले म्हणाले की, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने राबविलेला हा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम आहे. आम्ही साथसंगंत करताना गाणं ऐकत असतोच मात्र सादरीकरणाची आम्हाला सवय नसते आता या कार्यक्रमासाठी साठी आम्ही वेगळी तयारी करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने साथसंगत करणारे कलाकार रंगमंचावर येतील आणि त्यांची कला सर्वांसमोर येईल असे मला वाटते.
इतकी वर्षे आम्ही गायकांना साथसंगत करीत आहोत. त्यांच्याकडून आम्हीही अनेक गोष्टी शिकत असतो, पण ते शिकलेलं गाणं आम्हाला सादर करायची संधी मिळत नाही, या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती संधी आम्हा कलाकारांना मिळते आहे याबद्दल श्रीनिवास आणि शिल्पा जोशी यांचे आम्ही आभारी आहोत, असे मत यावेळी प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पखावज वादक अखिलेश गुंदेचा म्हणाले की, वर्षानुवर्षे आम्ही कलाकारांना साथसंगत करीत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या कलाकारांचा आमच्यावर प्रभाव असतो. याबरोबरच साथसंगत करणारे कलाकार हे कधीच प्रकाशझोतात येत नाहीत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते होत आहे. पण हे करीत असताना आम्हा कलाकारांवरही दडपण आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व गायक कलाकारांना कोल्हापूरचे तबलावादक महेश देसाई हे तबला तर मिलिंद कुलकर्णी हे हार्मोनियमची साथसंगत करतील.