पुणे : मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनची भागीदार संस्था असलेल्या पुण्यातील ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’ या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला. इंडस्ट्री लिंक्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम (आयएलएसडीपी) या संकल्पनेअंतर्गत करण्यात आलेल्या या सामंजस्य करारामुळे रोजगारनिर्मिती होण्यासाठी चालना मिळणार असून बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
यामध्ये विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी, आणि कार्यकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या करारानुसार यशस्वी अकॅडमी फार स्किल च्या माध्यमातून ऑटो मोबाईल, रिटेल व बीएसएफआय क्षेत्रात ३ वर्षासाठी प्रशिक्षण देणार असून ५००० लाभार्थ्यांना यातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून त्यासाठी आपण सर्व एकत्रित रित्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करु व उत्तम प्रकारे त्याची अंमलबजावणी करून, प्रगतशील देश घडवू असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.