पुणे : युवकांनी उद्योजकतेचा मार्ग करिअर म्हणून निवडावा, नोकरी शोधण्यापेक्षा आपण नोकरी देणारे कसे होऊ शकतो यादृष्टीने मानसिकता तयार करायला हवी, असे मत भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे क्षेत्रीय अधिकारी विशाल चव्हाण यांनी व्यक्त केले, ते यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे आयोजित ‘उद्योजकता मार्गदर्शन परिसंवादात’ बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी उद्योजक होण्यासाठीची मानसिकता, उद्योजकतेचे प्रशिक्षण, समुपदेशन, बँकेच्या माध्यमातून नवउद्योजकांना २५ लाख रुपयांपर्यंतचे विनाजामीन व विना तारण भांडवली कर्ज उपलब्ध करून देणे, उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करणे याविषयी सविस्तर माहिती दिली.
तर भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे पुणे विभाग प्रमुख रोशन अहिरे यांनी बोलताना सांगितले कि, बीवायएसटी तर्फे नवउद्योजकांना कशाप्रकारे उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले जाते याविषयी माहिती सांगितली, तसेच याआधी ज्यांनी अशाप्रकारचे मार्गदर्शन घेतले व जे स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यात यशस्वी होऊ शकले अशांची माहितीही सांगितली. तसेच बीवायएसटीतर्फे उद्योग सुरु झाल्यानंतरसुद्धा आवश्यकतेनुसार ज्या बाबी शिकणे व समजून घेणे आवश्यक असते अशा नवीन बाबींचे प्रशिक्षणसुद्धा केले जाते असे सांगितले, ज्यामध्ये जीएसटी, डिजिटल पेमेंट आदींचा समावेश होतो.
याप्रसंगी उद्योजकता प्रशिक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय सिंग, संचालिका स्मिता धुमाळ. केंद्र समन्वयक प्राची राऊत यांच्यासह सर्व प्रशिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.