भगवान रविदास दिनदर्शिकेच्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन
पुणे/प्रतिनिधी : भगवान रविदास दिनदर्शिकेच्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन पुण्याच्या कात्रज येथील संत रविदास मंदिराच्या सभागृहात संत सुखदेवजी वाघमारे महाराज व केंद्रीय लोक निर्माण विभागाचे वरिष्ठ कार्यपालक अभियंता, आर. एस. वर्मा यांच्या शुभ हस्ते रविवारी संपन्न झाले.
दिनदर्शिकेचे प्रकाशक व ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठोंबरे, मंत्रालयातील माजी प्रशासकीय अधिकारी विठ्ठल जवादे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. डी. एस. निर्मले, दलित रत्न एस. दशरथ, रोशन सिंग, अमोल वाघमारे व समाजातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर वर्मा, संत सुखदेवजी महाराज, जवादे, डॉ. निर्मले यांच्यासह अनेकांनी दिनदर्शिकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत प्रकाशक ठोंबरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सदर दिनदर्शिकेबाबत बोलताना लवकरच भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनेक आवृत्या प्रकाशित करण्याचा मनोदय प्रकाशक ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी व्यक्त करुन चर्मकार समजाने भगवान रविदास दिनदर्शिकेला आपल्या अंत:करणात सन्मानाच स्थान दिल्याबद्दल समाजाचे आभार मानले.
या दिनदर्शिकेची महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये दिवसें दिवस मागणी वाढत असून देशातील `चर्मकार बांधवांची दिनदर्शिका’ म्हणून ही नावारुपाला येत आहे. भगवान रविदासांवर आधारीत जगातील सर्वात अगोदर सुरु होणारी व नियमित प्रकाशित होणारी दिनदर्शिका म्हणून या दिनदर्शिकेकडे चर्मकार समाज सन्मानाने पहात आहे.