पुणे : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी लढत दिली. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 4 हजार मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 79 हजार मतं मिळाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनीही या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र किशोर शिंदे तरीही त्यांचा एवढा भक्कम विरोध करू शकतील असे कोणाला वाटत नव्हते , भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघात चंद्रकांत दादा मोठ्ठे मताधिक्य घेऊन विजयी होतील असेच सर्वांना वाटत होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यात झाली. मोदी यांची सभा मुख्यत्वे पाटील यांच्यासाठी झाली. पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाची केंद्राची व राज्याची यंत्रणाही कामाला लागली होती. शहरातील भाजपची सर्व यंत्रणा या भागात दिवसरात्र प्रचारात होती. पाटील यांच्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. या सर्व बाबींचा विचार करता किशोर शिंदे यांना खूपच चांगली मते मिळाली .