पुणे/सातारा : ढगाळ वातावरण… यवतेश्वर घाटातील धबधबे… रस्त्यावर आलेले ढग… अशा आल्हाददायी वातावरणात रविवारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले. ‘मैं भी सिपाही’ ही यंदाच्या स्पर्धेची संकल्पना होती.
खुल्या गटात फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) या धावपटूने १ तास १० मिनिटे आणि ६ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करत प्रथम आला. केनियाचा हिलारी किप्टू किमोसोप दुसरा, तर भारतीय धावपटूंमध्ये औरंगाबादच्या धनावत प्रल्हाद रामसिंग याने पहिला, भारतीय महिला गटात स्वाती गाडवे हिने पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलिस कवायत मैदानावरुन सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शौर्यचक्र विजेते सुभेदार त्रिभूवन सिंग, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा रनर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पोवई नाका, कर्मवीर पथमार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा- समर्थ मंदीरमार्गे बोगदा-प्रकृती रिसाॅर्ट, परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलिस चौकी, कर्मवीर पथावरुन नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलिस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली.
“नेटक्या संयोजनामुळे सातारा रनर्स फौंडेशनचे पदाधिकारी व सर्व टीम कौतूकास पात्र आहे. गिनिज बुकमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. या पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करत सातारा हिल मॅरेथॉन आपल्या साताऱ्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल,” अशा शब्दात उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
खासदार उदयनराजे भोसले, सुभेदार त्रिभूवन सिंग, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत, दिलीप दोशी, गणेश देशमुख, राम कदम, लेफ्टनंट कर्नल रणजित नलावडे, किसनवीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. पोलिस कवायत मैदानावर तत्काळ वैद्यकीय सेवा तैनात ठेवण्यात आली होती. जणू छोटा अतिदक्षता विभागच उभारण्यात आला होता. ह्रदयविकाराचा झटका आल्यास अशाप्रसंगी तत्काळ लागणारं इंजक्शनही वैद्यकीय कक्षात उपलब्ध होते. १२ डाॅक्टर ; पैकी एक पुर्णवेळ कार्डिऑलॉजीस्ट, २ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ असा चोख वैद्यकीय बंदोबस्त होता.
सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा सविस्तर निकाल
पहिला क्रमांक : फिक्रू अबेरा दादी, इथिओपिया (१.१०.०६), रुपये – १,५०,०००/-
दुसरा क्रमांक : हिलारी किप्टू किमोसोप, केनिया (१.११.३५) रुपये – १,००,०००/-
तिसरा क्रमांक : फ्रेसिव अस्फाव बेकल, इथिओपिया (१.११.५६) रुपये ७५,०००/-
महिला गट
पहिला क्रमांक : मर्सी जेलीमो टू, केनिया (१.२४.३०), रुपये १,५०,०००/-
दुसरा क्रमांक : जेनेट ऍडेक अग्टेव, इथिओपिया, (१.२५.४८), रुपये १,००,०००/-
तिसरा क्रमांक : झिनेबा कासिम गेलेटो, इथिओपिया, (१.२९.३५), रुपये ७५,०००/-
भारतीय (पुरुष)
दुसरा क्रमांक : राहूल कुमार पाल, (१.१३.१९), रुपये ३०,०००/-
तिसरा क्रमांक : आदिनाथ भोसले, (१.१५.०४), रुपये २०,०००/-
भारतीय महिला
पहिला क्रमांक : स्वाती गाडवे, (१.२५.१८), रुपये ५०,०००/-
तिसरा क्रमांक : आरती देशमुख (१.३३.४०), रुपये २०,०००/-
बाईक ऍम्ब्युलन्स व फूट मसाज
धावपटूंच्या वैद्यकीय सोईसाठी १३ रुग्णवाहिका होत्या. त्यात ६ कार्ड्याक, ७ मिनी रुग्णवाहिका २ बाईक अँब्युलन्सचा समावेश होता. गरजेनुसार रुग्णाला जागेवर कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. मॅरेथॉन झाल्यानंतर धावपटूंसाठी फूट मसाजची व्यवस्था करण्यात आली होती. पायांची मसाज करणा-या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईच्या कांचन काया या स्वयंसेवी संस्थेतील ६ अंधबांधवांचा समावेश होता. त्यांच्याकडील कौशल्य पाहून धावपटूंसह सातारकरही आवाक झाले. सातारा रनर्स फौंडेशनच्या सहकार्यामुळे अंधबांधवांनी ही सेवा दिली होती.