पुणे-: राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता मुष्ठियोद्धा नमन तंवर याला पुण्यातील मोर्डे फूड्स या खाद्यपदार्थ उत्पादक समूहाने आपला पाठिंबा जाहीर केला असून क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था “लक्ष्य”च्या माध्यमातून हे साहाय्य करण्यात येणार आहे.
गेल्या 2 वर्षापासून लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या नमन तंवरने 2016 मध्ये रशियात झालेल्या एआयबीए युवा जागतिक मुष्ठियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. तसेच, 2017 मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या गॅलिम झारीलगापोव्ह मुष्ठियुद्ध या स्पर्धेत नमनने सुवर्ण पदकासह सर्वोत्तम मुष्ठियोद्धा हा किताब पटकावला होता.
मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किशोर मोर्डे म्हणाले की, इंडिया ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या नमनला पाठिंबा देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे आणि या पाठिंब्याचा उपयोग करून नमन आपली कामगिरी आणखी उंचावेल, अशी आम्हांला खात्री आहे. चॉकोलेट उत्पादनात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मोर्डे फूड्सला नमनच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही भाग्यवान ठरलो आहोत असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना “लक्ष्य”चे उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर आणि सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, टोकियो ओलंपिकला एक वर्षाचा कालावधी बाकी असताना विविध पात्रता स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या नमनला हा पाठिंबा अत्यंत योग्य वेळी मिळाला आहे. “लक्ष्य”च्या वतीने मिळालेले सर्वांगीण साहाय्य या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे ठरणार असून त्यांचा आत्मविश्वास त्यामुळे उंचावणार आहे.
खेळाडूंना पाठिंबा देण्याऱ्या पुरस्कर्त्यांमध्ये आघाडीचे खाद्यपदार्थ उत्पादक मोर्डे फूड्स समुहाचा समावेश करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे आगामी काळात भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनण्यास मदत होणार असल्याचे “लक्ष्य”चे उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर यांनी सांगितले.
“लक्ष्य” चे प्लेअर मॅनेजमेंट प्रमुख ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आणि खजिनदार भरत शहा म्हणाले की, या साहाय्याचा पुरेपूर उपयोग करून नमन तंवर टोकियो ओलंपिकसाठी भारतीय संघात नक्की स्थान मिळवेन, असा आम्हांला विश्वास वाटतो. तसेच, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला पदक मिळविण्याचीही निश्चित संधी आहे.
ग्रँडमास्टर अभिजित कुंटे पुढे म्हणाले की, येत्या काही महिन्यात नमनला आपल्या बलस्थानावर आणि तंदरुस्तीवर आणखी भर द्यावा लागणार आहे. तरच, त्याला 91 किलो गटातील आपल्या प्रतिस्परध्यांवर मात करता येईल. हे शक्य झाल्यास टोकियो 2020 ओलंपिकमध्ये पदक मिळविण्याची नमनला उत्तम संधी असल्याचे मत राष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे.
दोन महिन्यापूर्वी आपला 20वा वाढदिवस साजरा करणारा नमन तन्वर राष्ट्रीय शिबिरात नसताना भिवानी येथे आपले प्रशिक्षक संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
तत्पूर्वी मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किशोर मोर्डे, वित्त व नियंत्रण महाव्यवस्थापक मदन देशपांडे यांच्या हस्ते नमन तंवर याचा सत्कार करण्यात आला.
लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या खेळाडूंची यादी
स्वप्निल कुसळे(नेमबाजी- नांदेड सिटी), सोनिया लाथर(मुष्ठियुध्द-भारत फोर्ज), यश आराध्या(गोकार्टींग मोटर स्पोर्टस्- भारत फोर्ज), विदित गुजराती(बुध्दिबळ- भारत फोर्ज), शुभंकर डे(बॅडमिंटन-भारत फोर्ज), प्रिथा वर्टीकर(टेबल टेनिस-दालमिया मानव सेवा ट्रस्ट), सिमरनजीत कौर(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सचिन सिवाच(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), निरज फोगट(मुष्ठियुध्द-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), नुपुर हगवणे पाटील(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), आयुषी पोतदार(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), मल्लिका मराठे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सचेत पिन्नानाथ(नेमबाजी-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), रौनक साधवाणी(बुध्दिबळ-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), शरण्या गवारे(टेनिस-सोनी पिक्चर्स नेटवर्कस्), सालसा आहेर(टेनिस-जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल), रेश्मा माने(कुस्ती- कांतिलाल लुंकड फाउंडेशन), साक्षी शितोळे(तिरंदाजी- सायबेज खुशबु/खुशबू चॅरिटेबल ट्रस्ट), सुहाना सायनी(टेबल टेनिस- शेविएट कंपनी), माहक जैन (शेविएट कंपनी), सिमरन कौर(कुस्ती-सुहाना प्रविण मसाले), नमन तंवर(मुष्ठियुध्द- मोर्डे फुडस्), ऋतुजा भोसले(टेनिस- भारत फोर्ज), अक्षय कुमार(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल), निशा मलिक(कुस्ती-बुक अ स्माईल), नताशा दुमने(तिरंदाजी-बुक अ स्माईल), प्राप्ती सेन(टेबल टेनिस- बुक अ स्माईल), मनिश(मुष्ठियुध्द- बुक अ स्माईल), साजन भानवल(ग्रेको रोमन कुस्ती-बुक अ स्माईल)